महाराष्ट्रात ४९० कोरोनाबाधित, २६ रुग्णांचा मृत्यू

0
28

मुंबई: राज्यात शुक्रवारी ६७ नवीन कोरोनाबाधित  रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ४३ रूग्ण एकट्या मुंबईतील आणि १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० वर गेली असून आतापर्यंत २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शुक्रवारी आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये पुण्यातील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे शुक्रवारी राज्यात ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि २ जण मुंबई येथील आहेत. मृतांपैकी बदलापूर, पुणे आणि मुंबईतील तीन रूग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केलेला नव्हता. तर जळगावमध्ये मृत झालेला रूग्ण कोरोनाबाधिताचा सहवासित होता.

निझामुद्दीन मरकझला गेलेल्यांपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्कः निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा