महाराष्ट्रात कोरोनाः ५२२ नवे रूग्ण, २७ मृत्यू, एकूण रूग्णसंख्या ८,५९०

0
70
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यात आज, सोमवारी ५२२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज राज्यात २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.

१ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांची चाचणीः राज्यात १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख १२ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा