पहिल्या दिवशी राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांनी मागवली घरपोच दारू!

0
14
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शुक्रवारपासून सकाळी १० वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील ४ हजार ८७५ ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १३९ अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश ११ मे  रोजी निर्गमित केला. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात आली. 

राज्य शासनाने ३ मेपासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर हे ३ कोरडे जिल्हे वगळता) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी ४ हजार ५९७ अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्यात २४ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांतून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त व संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून १२  सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे.

२ हजार ४५७ मद्य तस्करांना अटकः १४ मे रोजी राज्यात ८४ गुन्हे नोंदवण्यात आले असून ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २२ लाख ६२ हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ मार्चपासून १४ मेपर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ५,४८९ गुन्हे नोंदविण्यात आले असून २,४५७ आरोपींना अटक आणि ५५४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत १४.९३ कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा