देशात कोरोनाचा उद्रेकः २४ तासांत आढळले नवीन ५७ हजार ११७ करोना पॉझिटिव्ह रूग्ण, ७६४ मृत्यू

0
26

नवी दिल्लीः देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ५७ हजार ११७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर ७६४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरू असतानाही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्येत वाढ झाली नव्हती.

देशात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ झाली आहे. तर एकूण ३६ हजार ५११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी १० लाख ९४ हजार ३७४ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या देशभरातील विविध रूग्णालयांत ५ लाख ६५ हजार १०३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात मागील तीनच दिवसांत १ लाख ६४ हजार कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

 देशातील सर्वाधिक कोरोना बाधित सहा राज्यांची स्थिती अशीः

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ लाख २२ हजार ११८ झाली आहे तर १४ हजार ९९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्येही कोरोना बाधितांची संख्या २ लाख ४५ हजार ८५९ झाली आहे. तर ३ हजार ९३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये बाधितांची संख्या १ लाख २४ हजार ११५ असून २ हजार ३१४ लोकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. आंध्रप्रदेशात १ लाख ४० हजार ९३३ एकूण कोरोना बाधित आणि १ हजार ३४९ मृत्यू, दिल्लीमध्ये १ लाख ३५ हजार ५९८ कोरोना बाधित आणि ३ हजार ९३६ रूग्णांचा मृत्यू तर गुजरातमध्ये ६१ हजार ४३८ कोरोना बाधितांची संख्या असून आजवर २ हजार ४३६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा