औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या ६२७ वर, दोन जणांचा मृत्यू

0
154
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात ६९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६२७ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

नव्याने आढळून आलेल्या रूग्णांत रामनगरातील २२, सदानंदनगर-सातारा परिसरातील ८,  किलेअर्कमधील ८, दत्तनगर-कैलासनगर, लेन नंबर पाचमधील ५, जुना बाजार येथील ४, भवानी नगर- जुना मोँढा भागातील ३,  न्याय नगरातील २ आणि पुंडलिक नगर गल्ली क्रमांक सहा, संजय नगर, एसआरपीएफ- सातारा परिसर, कोतवालपुरा, सिडको एन-४, बीड बायपास रोड, कैलास नगर, बायजीपुरा येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील सातारा गावातील १, गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा येथील ५ रूग्णांचाही यात समावेश आहे. या रूग्णांमध्ये ३६ पुरूष आणि २६ महिलांचा समावेश आहे.

रामनगर, पुंडलिक नगरातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यूः  पुंडलिक नगरातील ५८ वर्षीय पुरूष रुग्णास मिनी घाटीतून घाटीमध्ये ९ मे रोजी संदर्भीत करण्यात आले होते. त्यांचा अहवाल याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता. संदर्भीत केल्यानंतर त्यांना तत्काळ घाटीच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. क्षयरोगामुळे फुफुसाचा एक भाग शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेला होता. तसेच मेंदुचा क्षयरोग, मानसिक व झटक्याचा आजारही त्यांना होता. दोन्ही फुफुसांच्या न्युमोनिआमुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६४ टक्के कमी झाले होते. म्हणून त्यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला होता. परंतु ११ मे रोजी त्यांना सायंकाळी ४.३० वाजता तीव्र झटका आल्याने व कोरोना आजारासह इतर आजार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर राम नगरातील ८० वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचाही आजच मृत्यू झाला. ताप, खोकला आणि दम लागत असल्याने त्यांना ८ मे रोजी दुपारी घाटी रुग्णालयात भरती केले होते.  त्यांचा ९ मे रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर ८ मेपासूनच अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना १० मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार होते. परंतु त्यांचाही उपचारादरम्यानच आज मध्यरात्री १.१० मिनिटांनी मृत्यू झाला, असे घाटी रूग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

किलेअर्कमधील ३६ जण कोरोनामुक्तः  नूर कॉलनी आणि मुकुंदवाडीतील संजय नगर येथील प्रत्येकी दोन अशा एकूण चार कोरोनाबाधितांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज सुटी देण्यात आली. किलेअर्कमधील तब्बल ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील आतापर्यंत एकूण ११३ जण कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा