राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६,८१७ वरः राज्याचा मृत्यूदर ४.४ टक्के!

0
55

मुंबई : राज्यात आज, शुक्रवारी कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत.सध्या एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज कोरोना बाधित १८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३०१ झाली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा मृत्यूदर ४.४ टक्के आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूपैकी १२ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यात कोरोनाचा मृत्यूदर ४.४ टक्केः सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो.  ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे. यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा