देशात २४ तासांत कोरोनाचे ९ हजार ८८७ नवे रूग्ण, २९४ रूग्णांचा मृत्यू

0
27
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत देशात ९ हजार ८८७ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून २९४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतची ही उच्चांकी आकडेवारी आहे. देश- दुनियेतील कोरोना संसर्गाबाबतचा हा ताजा तपशील…

 देशः देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २ लाख ३६ हजार ६५७ झाली आहे. त्यापैकी १ लाख १४ हजार ७३ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून सध्या १ लाख १५ हजार ९४२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने ६ हजार ६४२ रूग्णांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २ हजार ४३६ नवीन कोरोना रूग्ण साडपल्याने कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या ८० हजार २२९ झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ८४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच २४ तासांत १ हजार १४९ नवीन कोरोना रूग्ण सापडले आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ४६ हजार ८० असून आतापर्यंत तेथे १ हजार ५१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये १ हजार ३३० नवीन कोरोना रूग्ण सापडल्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २६ हजार ३३४ झाली आहे. दिल्लीत आजवर कोरोनाने ७०८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये २४ तासांत ५१० कोरोना बाधित रूग्ण सापडले तर एकाच दिवशी ३५ रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. गुजरातेतील एकूण कोरोना बाधितांची संख्या १९ हजार ११९ झाली आहे तर आतापर्यंत १ हजार १९० लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातमध्येच देशातील एकूण कोरोना बाधित रूगसंख्येच्या ७५ टक्के रूग्ण आहेत.

 दुनियाः जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ६, ८५०, २३६ झाली आहे तर ३ लाख ९८ हजार २४४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १९ लाख ६५ हजार ७०८ कोरोना संक्रमित रूग्ण असून १ लाख ११ हजार ३९० लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ३५ हजार ४७ तर ब्रिटनमध्ये ४० हजार २६१ लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. इटलीमध्ये ३५ हजार ७७४, स्पेनमध्ये २७ हजार १३४, फ्रान्समध्ये २९ हजार १११ आणि मेक्सिकोमध्ये १३ हजार १७० लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा