मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर; मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेः मोदीजी,देशाला संबोधित करा!

0
3

मुंबईः महाराष्ट्र के लोग बहादूर है, वो बहादुरी से सामना करते है, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या महाराष्ट्रातील जनतेचे कौतुक केले. तर येणाऱ्या काळात सणवार असल्यामुळे कोरोना वाढू नये, याचे आपल्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला कसा करायचा, याबाबत एकदा देशाला संबोधित करा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना केली.

आज मोदी यांनी देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही बैठकीत सहभाग घेतला. कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना मोदींनी यावेळी केली.

पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. राज्यात दररोज दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवित आहोत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडवाः राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत, आम्ही न थकता लढतो आहोत आणि हरणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

चष्म्याप्रमाणेच मास्क ही अपरिहार्यताः मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना ठाकरे यांनी चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले की, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार, तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही. मोदींना हे उदाहरण इतके आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा