विमान उड्डाणांबाबत सरकारचा कोणताच निर्णय नसताना एअर इंडियाची तिकिट बुकिंग सुरू कशी?

0
55

नवी दिल्लीः देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग थांबलेला नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही घटलेली नसताना एअर इंडियाने ४ मेपासून देशांतर्गत आणि १ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी तिकिट बुकिंग सुरू केले आहे. ३ मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार असला तरी त्यानंतर लॉकडाऊनची मुदत वाढणारच नाही, असे कोणतेही संकेत केंद्र सरकारने दिलेले नसताना ४ मेपासून देशांतर्गत विमान उड्डाणांचे तिकिट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. १ जूनपासन आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी तिकिट बुकिंग करण्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नसताना एअर इंडियाने परस्पर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी तिकिटाचे बुकिंग सुरू केेलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असतानाच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निर्णय झाल्यानंतर विमान उड्डाण कंपन्यांनी तिकिट बुकिंग सुरू करावे, असा सल्ला केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिला आहे.

देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी ३ मेपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी ३१ मेपर्यंत बुकिंग घेतले जाणार नाही, असे एअर इंडियान आधी स्पष्ट केले होते. मात्र ४ मेपासून काही निवडक देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी आणि १ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी बुकिंग घेण्यात येत असल्याचे एअर इंडियाच्या वेबसाइटवर म्हटले आहे.

विमान उड्डाण कंपन्यांच्या या लगीन घाईवर केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकार जेव्हा निर्णय घेईल, तेव्हाच विमान उड्डाण कंपन्यांनी तिकिटांचे बुकिंग सुरू करावे, असा सल्ला पुरी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा