आवश्यक आणि अनावश्यक असा भेद न करता ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडणार

0
960
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊन-३ च्या कालावधीत मॉल वगळता आवश्यक आणि अनावश्यक असा कोणताही भेद न करता ग्रामीण भागातील सर्व दुकाने उघडण्यात येणार आहेत. राज्य सरकारने शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

केंद्र सरकारने आज संपणारा लॉकडाऊन येत्या १७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शनिवारी रात्री जारी केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश, मालेगाव महानगरपालिका, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची हद्द वगळता शहरी भागातील एकाकी दुकाने, संकुलाजवळील तसेच निवासी संकुलातील दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक आणि अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत/ लेनमध्ये पाचपेक्षा जास्त दुकाने खुली असू नयेत. जर एखाद्या लेनमध्ये पाचपेक्षा जास्त दुकाने असतील तर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानेच खुली रहाणार आहेत. मात्र सर्वांना सामाजिक अंतर राखणे सक्तीचे करण्यात आले आहे.

हेही वाचाः मद्यविक्रीला मुभाः सोमवारपासून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील वाइन शॉप्स उघडणार, अटी लागू

सरकारी कार्यालयात ३३ टक्के कर्मचारीः मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव या चार महानगरपालिकांची हद्द वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय  कार्यालये उपसचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ३३ टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील कार्यालये मात्र कोणत्याही निर्बंधासह सुरू राहतील, असे या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.

हेही वाचाः आरोग्य सेतु ऍप म्हणजे लपून चोरून निगरानी करणारे जुगाडः राहुल गांधींनी व्यक्त केली शंका

तिन्ही झोनमध्ये या बाबींवर बंदीः रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमध्ये बार आणि परमिट रूम, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, जलतरण तलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्णपणे बंदी राहील. या तिन्ही झोनमध्ये सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी तर राहीलच शिवाय धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यावरही बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा