पुण्यातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहणः उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश

0
298
संग्रहित छायाचित्र.

पुणे  पुणे शहराची कोरोना संदर्भातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले होते. आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याअनुषंगाने राज्य शासनस्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

क्वारंटाइन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांची अथवा खाजगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्टखाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतीरिक्त ५५ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती  कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यात ८ वा, ९ वा आणि १० वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आदेश त्यांनी दिले.

झोपडपट्टीवासियांसाठी राहण्याची वेगळी सुविधाः पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत.  अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी  सामाजिक अंतराचे पालन होऊन कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा