वाधवान बंधूंच्या डीएचएफएल आणि संबंधित कंपनीन्यांनी भाजपला दिली १९.५ कोटींची देणगी

0
888
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात लॉकडाऊन आणि जिल्हाबंदी असतानाही आपल्या कुटुंबीयांसह २३ जणांना खंडाळ्याहून महाबळेश्वर घेऊन गेल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या डीएचएलएफ आणि संबंधित कंपन्यांनी भाजपला तब्बल १९.५ कोटींची देणगी दिल्याचे भाजपने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या फायलिंगची आकडेवारी सांगते. दरम्यान, वाधवान यांचे भाजपशीच आर्थिक लागेबांधे असून गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्यासाठी दिलेल्या पत्रामागेही भाजपचाच हात असू शकतो, असा दावा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

वाधवान बंधूंच्या डीएचएफएल कंपनीची असोसिएटेड कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा विश्वासू आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी इक्बाल मिर्चीची मुंबईतील संपत्ती विकून दिली आणि ‘टेरर फंडिग’ केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) नोव्हेंबर २०१९ मध्ये आरकेडब्ल्यूची चौकशी केली होती. त्याच पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या ( पीएमसी) दरम्यान ४,३५५ कोटी रूपयांच्या घोटाळ्यातही डीएचएफएल आणि वाधवान बंधू चर्चेत आले होते. तेव्हाच द वायरने प्रकाशित केलेल्या एक्सक्लुझिव्ह वृत्तांत भाजप आणि वाधवान बंधूंचे आर्थिक लागेबांधे असल्याचे म्हटले आहे.

द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, २०१४-१५ मध्ये वाधवान बंधूंच्या डीएचएफएलची असोसिएटेड कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सने भाजपला १० कोटी रुपयांची देणगी दिली. कोब्रापोस्टने जानेवारी २०१९ मध्ये याच मुद्याकडे लक्ष वेधले होते. भाजपला विविध निवडणूक विश्वस्त संस्थांकडून मोठ्या प्रमाणात नियमित देणग्या मिळतात. या ट्रस्ट वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसकडून देणग्या गोळा करतात. मात्र आरकेडब्ल्यूने भाजपला जी रक्कम देणगी म्हणून दिली, तेवढी रक्कम देशातील कोणत्याही एका कंपनीने व्यक्तिशः आजपर्यंत दिलेली नाही.

इक्बाल मिर्चीची संपत्ती खरेदी केलेल्या सनब्लिंग रिअल इस्टेट आणि स्कील रियल्टर्सचे डायरेक्टर एकच आहेत. त्या स्कील रियल्टर्सनेही भाजपला २०१४-१५ मध्ये  २ कोटी रुपयांची देणगी दिली. विशेष म्हणजे आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे डायरेक्टर असलेले प्लासिड जेकब नरोन्हा हे  दर्शन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचेही डायरेक्टर आहेत. २०१६-१७ मध्ये दर्शन डेव्हलपर्स प्रा. लि.ने भाजपला ७.५ कोटी रुपयांची देणगी दिल्याचेही द वायरने म्हटले आहे.

दरम्यान, वाधवान समूह हा भाजपचा प्रमुख देणगीदार राहिला आहे. त्याच्या बदल्यात भाजपने वाधवान यांची वेळोवेळी मदत केली आहे. वाधवान कुटुंबातील २३ जणांच्या महाबळेश्वर पर्यटनासाठी पत्रप्रपंच करणारे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती फडणवीस सरकारच्याच काळात झाली होती. त्यामुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी जे पत्र देण्यात आले, त्यामागे भाजपच्याच बड्या नेत्याने शब्द टाकला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा