तळीरामांसाठी खुश खबरः औरंगाबादेत देशीदारू विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी!

0
68
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः लॉकडाउनच्या काळात बंद केलेली देशी दारू विक्री राज्यभरात सुरु करण्यात आली मात्र औरंगाबाद महापालिका हद्दीत सुरु न केल्याने वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही प्रतिसाद न दिल्याने देशी दारू विक्रेता संघाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मागील सुनावणीदरम्यान खंडपीठाने १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार १ ऑगस्टपासून अटीशर्तींसह देशी दारु विक्री करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही त्यांनी जारी केल्या आहेत.

लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आलेली देशी दारू विक्री राज्यभरात पुन्हा सुरू करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी तीन मेच्या परिपत्रकानुसार परवानगी दिली. त्यानंतर सर्वच जिल्ह्यांसह औरंगाबाद महापालिकेची हद्द वगळता  ग्रामीणमध्येही दारू विक्री सुरू झाली होती. मात्र महापालिका हद्दीत परवानगी देण्यात न आल्याने सुनील जैस्वाल व १३ याचिकाकर्त्यांनी ॲड. रुपेश जैस्वाल यांच्यातर्फे खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

देशी दारू विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी घातल्या आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केवळ सीलबंद  देशी दारु विक्री करता येणार आहे. दारु खरेदीसाठी पाचहून अधिक ग्राहक आल्यास दोन ग्राहकांतील अंतर सहा फूट ठेवावे लागणार आहे. त्यासाठी दुकानासमोर वर्तुळ आखावे लागणार आहे. नोकर, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी लागणार असून सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांना दुकानात प्रवेश देता येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

या नियम व अटींशिवाय दर दोन तासांनी दुकान, भोवतालचा परिसर निर्जतुंकीकरण करावा लागणार असून दुकानात दारु पिण्यास परवानगी नसणार आहे. महत्वाचे म्हणजे कंटेनमेंट झोनमधील  देशी दारु विक्री मात्र बंदच राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा