कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना सज्जतेचे आदेश

0
430

औरंगाबाद :  दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढू लागली असून  कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले आहेत. संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचे प्रमाण आणि जनजागृती प्रमाण वाढवावी तसेच कोरोना उपचारासाठी  जिल्ह्यात वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारीपर्यंत सुरू ठेवाव्यात, असे  निर्देश त्यांनी दिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी गुरुवारी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, घाटीच्या औषध विभागाच्या डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या डॉ. ज्योती बजाज यांच्यासह इतर सर्व संबंधित उपस्थित होते.

कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गासाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, जिल्हा परिषद कार्यालय येथे येणाऱ्या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरु कराव्यात. महापालिकेने कोरोना तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेत आढळून आलेल्या विविध आजारांची लक्षणे असलेल्यांचा रूग्ण निहाय पाठपुरावा करून अद्ययावत माहिती ठेवावी, असे चव्हाण म्हणाले.

हेही वाचाः खबरादारी घ्याः औरंगाबादेत पुन्हा आढळले १७० कोरोनाबाधित रुग्ण, चार जणांचा मृत्यू

वाढीव बेड्स तयार ठेवाः औरंगाबाद जिल्हयात लिक्वीड ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाने संबंधिताकडे पाठपुरावा करून निर्मिती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. संसर्ग वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांनी विभागीय आयुक्त यांच्या निर्दैशानुसार वाढीव खाटांची तयारी ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ठेवाः रेमडेसिवीरची पुरेशी उपलब्धता ठेवण्यासाठी घाटी, मनपा, जिल्हा रुग्णालय यांनी समन्वय ठेवून इंजेक्शन उपलब्ध ठेवावे. कोरोना उपचारपद्धती बाबतचे प्रशिक्षण डॉक्टर, नर्सेस, यांच्यासह पॅरामेडिकल स्टाफला देण्याचे नियोजन घाटीने करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दोन दिवसांत आढळले ३०८ रुग्णः दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आटोक्यात आलेली कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोनच दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात ३०८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात बुधवारी आढळलेल्या १३८ आणि गुरुवारी आढळलेल्या १७० रुग्णांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा