कोरोना रूग्णांची लूटः औरंगाबादेत १४ रूग्णालयांनी उकळली ६२ लाख ३३ हजार रुपये जास्तीची रक्कम

0
93
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर राज्य सरकारने निश्चित केलेले असतानाही औरंगाबादेत खासगी रूग्णालयांकडून कोरोना रूग्णांची लूट सुरू असून शहरातील १४ खासगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांकडून तब्बल ६२ लाख ३३ हजार रुपये एवढे जास्तीचे बिल उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या रूग्णालयांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना नोटिसा बजावल्या आहेत.

सरकारी आदेश झुगारून औरंगाबाद शहरातील १४ खासगी रूग्णालयांनी ६५६ कोरोना रुग्णांकडून ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. त्याबाबत २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १४ रूग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सदर नोटीसला सात दिवसांत हॉस्पिटलने समर्पक उत्तर न दिल्यास व बिल कमी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास कायद्यानुसार दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने २१ मे  व ३१ ऑगस्टच्या अधिसूचनेनुसार कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर याबाबत परिशिष्ट क नुसार दर निश्चित केलेले आहेत. यामध्ये दवाखान्यातील डॉक्टरच्या शुल्काचाही समावेश आहे.

मात्र औरंगाबाद शहरातील बरीच खासगी रूग्णालये रुग्णांकडून जादा दराने बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रूग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलाच्या तपासणीसाठी सहाय्यक लेखाधिकाऱ्यांची करण्यासाठी नेमणूक केली. त्यानुसार सदर बिलांची सखोल तपासणी करण्यात येत असून तपासणीअंती औरंगाबाद शहरातील १४ रूग्णालयांमध्ये ६५६ कोरोना रुग्णाचे  बिलाची एकूण ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम उकळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

तपासणीसाठी नियुक्त सहाय्यक लेखाधिकाऱ्यांनी बिलातील जादा आकारणी बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ,बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन १९४९ व बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट २००६ मधील तरतुदीनुसार औरंगाबाद शहरातील १४ रूग्णालयांना ६२ लाख ३३ हजार इतकी बिलाची जादा रक्कम आकारणी का केली म्हणून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.

लाईफलाइन हॉस्पिटलने परत केले ३ लाख ३० हजार रुपयेः लाईफलाईन हॉस्पिटलला १५ रूग्णांचे ३ लाख ३० हजार रुपये परत करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांकडून आकारलेली अतिरिक्त रक्कम परत केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा