दुचाकीच नव्हे, औरंगाबादच्या रस्त्यावर आजपासून सायकल चालवायलाही पोलिसांकडून बंदी!

0
141

औरंगाबादः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आज बुधवारपासून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत  कोणत्याही व्यक्तीला सायकलसह सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहने चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

 औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ या कलम १४४ (१)(३) अन्वये हा मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार  स्थानिक रहिवासी,अभ्यागत, कामानिमित्त वारंवार औरंगाबादमध्ये प्रवेश करणारे नागरिक यांना पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोणत्याही रस्त्यावर किंवा गल्लीत सायकलसह पारंपरिक व अपारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटारसायकल, सर्व प्रकारची तीन चाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, जड वाहने यांचा प्रवास व वाहतुकीसाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशानुसार रीक्षा, टॅक्सी व तत्सम वाहनांनाही वाहतुकीसाठी मनाई करण्यात आली आहे.

या मनाई आदेशातून पोलिस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती, तातडीची रूग्ण वाहतूक ( रीक्षासाठी एक चालक, एक प्रवासी, चारचाकीसाठी एक चालक दोन प्रवासी), रुग्णालयातील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अत्यावश्यक सेवेतील वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बँक, एटीएम आणि प्रसारमाध्यमे व त्यांचे प्रतिनिधी यांना सूट देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा