बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

0
21

मुंबई: राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सावध व्हावे, गर्दी टाळावी, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू असा विश्वास राज्यातील जनतेला दिला.

थेट प्रसारणाच्या माध्यमातून ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करताना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला. त्यासाठी दिलगीर आहे. आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची अजिबात कमी नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे ठाकरे म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केलेली नाही. कोरोना संकटापाठोपाठ आर्थिक संकट येऊ नये. राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हे वेतन टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे पहिल्यांदा दिले जातील. त्यामुळे वेतन कपात होईल ही भीती कुणीही मनात बाळगू नये, गैरसमज करून घेऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धोका आहे, काळजी घ्याः राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत. धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये. गर्दीही करू नये. रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, ही समाधानाची बाब आहे. वातानुकूलन यंत्रणा (एसी) लावू नका. थंड पाणी, थंडपेय, थंड सरबत यापासून थोड्या काळासाठी दूर राहा. ॲलर्जी टाळा. साधे पाणी प्या. यामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी पडशासारखे आजार तुम्ही दूर ठेऊ शकाल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

थंड पेय, थंड सरबत यापासून दूर राहाः खाजगी डॉक्टरांना  दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा. परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका, असे ठाकरे म्हणाले.  

गणवेशधारी डॉक्टर हे योद्धेचः नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस शी आपण बोललो. त्यावेळी ते गणवेशधारी योद्ध्यासारखे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर, एसटीचे ड्रायव्हर, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, या सगळ्यांचे मला खूप कौतुक वाटते अशा शब्दात ठाकरे यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा