कोरोनाचा सामना करायचाय?, हे आहेत आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीचे उपचार

0
212
प्रतिकात्मक छायाचित्र.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने यासाठी टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड-१९ ने सूचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेतला आहे.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपचार

आयुर्वेदिक औषधीः संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करा. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवा व नंतर हे पाणी प्या. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करा (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करा).  सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेल तेल बोटाने लावा. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या करा व नंतर हे तेल थुंका व गरम पाण्याने चूळ भरा. असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करा.

युनानी औषधीः काढा (जोशंदा)-घटक द्रव्ये- बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळा व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्या. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्या. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधीः १. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्या. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करा.

कोरोनासारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावयाची औषधेः

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्या.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्या.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाका.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.

युनानी औषधी
१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या करा, असे १५ दिवस करा.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परता व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळा. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्या.

ही औषधे व उपचार हे आजाराला प्रतिबंध व्हावा तसेच अशा अनेक रूग्णांवरील पूरक उपचारास फायदेशीर ठरू शकतात म्हणून सूचविण्यात आले आहेत. तथापि कोरोनाची लक्षणे जाणवल्यास शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडून तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय
१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करा.२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुवा.
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.
४. आजारी व्यक्ती किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क टाळा. कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळा.

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे
१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्या. ऋतूनुसार भाज्यांचा समावेश करा.
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोरोनाची लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जड असलेले पदार्थ टाळा.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करा.
९.  सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्या, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा