भाजपच्या आंदोलनात नेतेच आंगणात, रणांगणाकडे कार्यकर्त्यांची पाठ!

0
934

मुंबईः कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाविकास आघाडीचे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने पुकारलेल्या ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ या हिंदी टॅगलाइनच्या आंदोलनात आज राज्यभरात भाजप नेते ठिकठिकाणी सहभागी झाल्याचे दिसले मात्र या आंदोलनाबाबत कार्यकर्ते फारसे उत्साही दिसून न आल्यामुळे  नेते आंगणात आणि कार्यकर्ते घरातच असेच काहीसे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, भाजपच्या आंदोलनात कोणीच दिसलं नाही. नेतेच काळ्या पट्ट्या बांधून होते. आकाशात कावळे सुद्धा आज दिसले नाहीत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

या आंदोलनासाठी पुढाकार घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आंदोलनात त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य होते. कोरोनाच्या विषयात राजकारण करणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत देणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयातील आंदोलनात सहभाग घेतला. तेथेही नेतेच होते. राज्यात ठिकठिकाणी भाजप नेत्यांनी केलेल्या आंदोलनातही असेच चित्र होते. स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र राज्यात कुठेही दिसून आले नाही.

भाजपचे आंदोलन नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेचः रोहित पवार- राजकारण न करण्याचे अनेकदा आवाहन करुनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का? एकतर लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसतेच. पण तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असे सगळे कसे लिहून दिले, असे ट्विट करून राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे. मास्क वापरण्याचा व अंतर ठेवण्याचा नियम वगळता हे सगळे नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटले. आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा