‘भाजपचे ‘माझे आंगण रणांगण’ आंदोलन महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग’

0
500
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने  शुक्रवारी ‘माझं आंगण रणांगण’ हे आंदोलन पुकारले असून महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या काळात भाजपने घेतलेल्या या भूमिकेवर सार्वत्रिक टिकेची झोड उठली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. घराच्या आंगणाला ‘रणांगण’ बनवणे याला शहाणपण म्हणत नाहीत. भाजपे काळे झेंडे आंदोलन हे कोरोना योद्ध्यांचा अपमान आणि महाराष्ट्र कमकुवत करण्याच्या कटाचा भाग आहे. हा प्रयत्न जनताच हाणून पाडेल,असे पवार यांनी म्हटले आहे.

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचे आणि भाजपचे काहीही भले होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान  देत असताना अशा पद्धतीचे ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते?  हा राज्याला पडलेला प्रश्न आहे. भाजपने आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचे पाप माथी घेऊ नकाः मुंबईसह महाराष्ट्रातील रूग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपायोजना केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य या आव्हानाचा यशस्वी सामना करत असताना भाजपने ‘काळे झेंडे’ आंदोलन करून महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करू नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे आणि महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचे पाप माथी घेऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काले झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त कोरोना योद्ध्यांचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीने लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल, असा विश्वाही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे हे वागणे महाराष्ट्रद्रोहचः संकटाच्या काळात भाजपच्या नेत्यांना राजकारण सुचतेच कसे? असा सवाल करत महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्य बाळासाहेब थोरात यांनी संकटकाळात भाजपचे हे वागणे महाराष्ट्रद्रोहच आहे, अशी घणाघाती टीका केली आहे. कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, असे भाजपचे नेते फक्त बोलतात. प्रत्यक्षात राज्य सरकार अडचणीत कसे येईल, महाराष्ट्रात गोंधळाचे वातावरण कसे निर्माण होईल याच दृष्टीने भाजप नेत्यांची कृती असते. संकटाच्या काळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावा लागेल, असे थोरात म्हणाले. कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही. सर्वांनी एकजुटीने सामना करण्याची ही वेळ आहे. अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. प्रत्यक्षात त्यांची कृती या भूमिकेच्या विरोधात आहे. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा