पंतप्रधान मोदींच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या आवाहनाला भाजप कार्यकर्त्यांकडूनच हरताळ

0
2700
छायाचित्र सौजन्यः शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल.

भोपाळः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १३० कोटी जनतेला ‘ सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन केले असले तरी त्यांच्या या आवाहनाला दस्तुरखुद्द मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांनीच खुलेआम हरताळ फासला आहे. मोदींनी रविवारी देशातील नागरिकांना संयम आणि संकल्पाचे दर्शन घडवण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहनही केले आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांत ना संयम दिसला ना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा संकल्प दिसला.

माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय संकट निर्माण झाले. काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बहुमत चाचणीला सामोरे न जाताच राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने भोपाळमध्ये रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या याच गर्दीत चौहान यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहारही अर्पण केला.

मोदींच्या आवाहनानुसार ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे तर सोडाच परंतु या कार्यकर्त्यांनी तोंडाला साधे मास्कही बांधले नव्हते किंवा त्यांच्याकडे सॅनिटायझरही नव्हते. सोशल डिस्टनिंग राखण्याच्या आवाहनानुसार दोन व्यक्तींमध्ये किमान एक मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. परंतु चौहान आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना दाटीवाटीने अगदी खेटून उभे राहिल्याचे चित्र खुद्द शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आलेल्या छायाचित्रांत स्पष्ट दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयम राखण्याचे आणि संकल्प करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले होते. परंतु त्यांच्याच पक्षाच्या नेत्यात आणि कार्यकर्त्यांत या दोन्ही गोष्टींचा अभाव दिसून आला.

विशेष म्हणजे शिवराजसिंह चौहान हे तब्बल १३ वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि सध्या ते भाजपच्या राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाचे प्रमुख आहेत. भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वातच सोशल सोशल डिस्टन्सिंगच्या मोदींच्या आवाहनाला असा जाहीर हरताळ फासण्यात आल्यामुळे मोदींनी केलेल्या ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याच्या आवाहनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा