भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा ‘आपुलकीचा संवाद’ फेसबुक लाइव्हचा व्हिडीओच गायब

0
1873
सौजन्यः सुधीर मुनगंटीवार यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.

मुंबईः भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुक लाइव्हद्वारे साधलेला ‘आपुलकीचा संवाद’ हा फेसबुक लाइव्हचा व्हिडीओ त्यांच्या वॉलवरून गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि माजी अर्थमंत्रीही आहेत. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता मी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतोय, अशी फेसबुक पोस्ट सुधीर मुनगंटीवार यांनी काल दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी केली होती. त्यानुसार मुनगंटीवार यांनी आज सायंकाळी ५ वाजता फेसबुक लाइव्ह केले. मात्र हे लाइव्ह संपल्यानंतर मुनगंटीवारांनी हा व्हिडीओच आपल्या फेसबुक वॉलवरून डिलिट करून टाकला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर पोमणे यांनी ट्विटरवर मुनगंटीवार यांच्या फेसबुक लाइव्हचा स्क्रिनशॉट टाकला आहे. त्या स्क्रिनशॉटवरून १.९ हजार फेसबुक यूजर मुनगंटीवारांच्या फेसबुक लाइव्हची खिल्ली उडवताना दिसत आहेत. नेटिझन्सन खिल्ली उडवल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर फेसबुक व्हिडीओ डिलिड करण्याची नामुष्की आल्याची प्रतिक्रियाही पोमणे यांनी ट्विटरवर नोंदवली आहे.

फेसबुक लाइव्हचा हा व्हिडीओ डिलिट का केला, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आलेले नाही. मात्र महाराष्ट्रातील एखाद्या भाजप नेत्यावर आपल्या फेसबुक लाइव्हचा व्हिडीओ डिलिट करण्याची अशी वेळ पहिल्यांदाच आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा