बंदी आदेश धुडकावून भाजप प्रदेशमहामंत्री सुरजितसिंह ठाकुरांची पंढरपुरात सहकुटुंब पूजा

0
501
चैत्री एकादशीला विठ्ठलाची महापूजा केल्यानंतर आ. ठाकूर यांनी ट्विटरवर शेअर केलेले छायाचित्र.

पंढरपूरः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाबंदी, जमावबंदीचे आदेश जारी करण्याबरोबरच राज्यातील सर्व धार्मिकस्थळेही सर्वसामान्यांसाठी बंद केली असतानाच भाजपचे प्रदेशमहामंत्री सुजितसिंह ठाकूर यांनी अनेकांच्या साक्षीने चैत्र एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सपत्नीक पूजा केली आहे. त्यामुळे बंदी, नियम, कायदे फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत की काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला असून या प्रकरणाची चौकशी करून आमदार ठाकूर, संभाजी शिंदे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य वंसतराव पाटील यांनी केली आहे.

सुजितसिंह ठाकूर यांनी शनिवारी ४ एप्रिल रोजी पंढरपूरच्या मंदिरात गर्दी जमवून कामदा एकादशीच्या दिवशी (चैत्रवारी) पहाटे श्री विठ्ठलाची पूजा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नींसह सहा ते सात जण होते. पूजा केल्यानंतर सुजितसिंह ठाकूर यांनी स्वतःच ट्विट करून ही माहिती दिली. त्यावर वसंतराव पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने राज्यात जमावबंदीचे आदेश दिले. जिल्हाबंदी लागू  केली. घराबाहेर पडलेल्या लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत. त्यांची वाहने जप्त केली जात आहेत. शनिवारी चैत्री एकादशी असूनही लॉकडाऊनमुळे विठ्ठल रूक्मिणीची यात्रा भरली नाही. असे असतानाही श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर, संभाजी शिंदे यांच्यासह अनेक मंडळींनी कुटुंबासोबत जाऊन विठ्ठल मंदिरात महापूजा केली. ठाकूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्याचे रहिवासी आहेत. उस्मानाबादेत कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. जिल्हाबंदी असताना ठाकूर पंढरपुरात कसे काय आले? त्यांना कुणी का रोखले नाही?  त्यांनी इतर लोकांचा जीव धोक्यात का घातला?  जिल्हाबंदी ही केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का? असे सवालही वसंतराव पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

 चैत्री एकादशीला विठ्ठल मंदिरात एकाच कुटुंबाकडून पूजा होत असताना आ. ठाकूर, शिंदे यांच्यासह अनेक मंडळी महापूजेला हजर होती. मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना मंदिरात कसे काय घेतले, याची चौकशी करावी अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

 सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपुरात आल्यावर कायदा सर्वांसाठी समान आहे, सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी मंदिर बंद असताना मी दर्शन कसे काय घेऊ, असे सांगत नामदेव पायरीवर डोके टेकून निघून गेले होते. याची आठवण देत वसंतराव पाटील यांनी पंढरपुरात घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून आ. ठाकूर, संभाजी शिंदे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा