‘महाराष्ट्र सेवक’ फडणवीसांच्या भाजपला हवा ‘पीएम केअर्स’साठी मराठी लोकांचा पैसा, महाराष्ट्र भडकला

0
2458

मुंबईः महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सबंध यंत्रणा अहोरात्र झटत असतानाच सोशल मीडियावर ‘महाराष्ट्र सेवक’ अशी बतावणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेश भाजपने कोरोनाच्या संकटासाठी पीएम केअर्स निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केल्यामुळे भाजपवर महाराष्ट्रद्रोही असल्याची टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्राला मदतीची गरज असताना पीएम केअर्समध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्याची भाजपवाल्यांची हिंमत होतेच कशी, असा सवालही या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत. आज हा आकडा ३३५ वर जाऊन पोहोचला आहे तर कोरोनाने राज्यातील १३ जणांचे बळी घेतले आहेत. या संकटाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ असे स्वतंत्र खाते सुरू करून २८ मार्च रोजी या निधीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाच्या पाचव्याच दिवशी महाराष्ट्र भाजपने ‘कोरोनाविरुद्ध लढू या… एकजुटीने! यथाशक्ती योगदान देऊ या, देशाला बळकट करू या!’ असे ट्विट करत पीएम केअर्स या पंतप्रधान सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले. महाराष्ट्र भाजपचे हे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला रूचलेले नाही.

‘चंद्रकांतदादा, ही राजकारण करण्याची वेळ नाही. महाराष्ट्र कठीण परिस्थितीतून जात असताना आपण मुख्यमंत्र्यांना साथ देणे महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित होते. मात्र या नाजूकप्रसंगी आपण जो दुजाभाव आणि द्वेष करत आहात, तो महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील छोटामोठा घटक मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून खारीचा वाटा उचलत असताना आपण द्वेष का करता?’, असा सवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला मदतीची गरज असताना महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना केंद्राचीच जास्त काळजी दिसत असल्याचे सांगत अनेक नेटकऱ्यांनी भाजपवाल्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवले आहे. महाराष्ट्र संकटात असताना असे आवाहन करायला भाजपला लाज कशी वाटत नाही? असा सवालही नेटकरी करू लागले आहेत. अन्य नेटकऱ्यांनीही भाजपचा चांगलाच समाचार घेतला असून आमच्या पैशाने महाराष्ट्रातील आमदार फोडण्यासाठी पीएम केअर्सला मदत करायची का? असेही विचारले जात आहे. ‘मी सोडून सारी लाज, अशी बेभान वागले आज की अक्कल विकले रे’ अशा शेलक्या शब्दात एका नेटकऱ्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा