‘सरकारच्या वतीनेच प्रातिनिधिक अभिवादन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा’

0
127
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांवतीने राज्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्यांना अभिवादन करून हा जयंती सोहळा साजरा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी राज्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. राज्यातील बाबासाहेबांच्या ठिकठिकाणच्या पुतळ्यांना अभिवादन आणि लाखोंच्या संख्येचा सहभाग असलेल्या मिरवणुका हे आंबेडकर जयंतीचे वैशिष्ट्ये असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करून सर्व प्रकारचे धार्मिक, राजकीय, सामाजिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. भीम जयंतीही घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आग्रही मागणी करण्यात येत असून  याबाबत रिपब्लिन विद्यार्थी सेनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सचिन निकम. ऍड. अतुल कांबळे, प्रा. प्रबोधन बनसोडे यांनी ७ एप्रिलपासून सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याबाबत सरकारच्या वतीने अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

गर्दी टाळावी आणि राज्यातील आंबेडकरी जनतेने घरातच राहून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करावी, यासाठी राज्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात शासन प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांच्या वतीने राज्यभरातील जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही जयंती साजरी करावी, अशी मागणी निकम यांनी केली आहे. याबाबत तातडीने शासन निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही राज्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा