कोरोनाचे संकटः महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये, फक्त ६ जिल्हेच ग्रीन झोनमध्ये!

0
884

नवी दिल्लीः केंद्र सरकारने ३ मे रोजीचा दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपुष्टात येण्याआधी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशा श्रेणींमध्ये विभागणी केली असून देशातील तब्बल १३० जिल्हे रेड झोनमध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ३१९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्रातील तब्बल १४ जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. राज्यातील केवळ ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारे आणि राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केल्यानंतर देशातील सर्व महानगरे म्हणजेच मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता रेड झोनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद, बेंगळुरू आणि  अहमदाबादचा समावेशही रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.  केंद्रीय गृह सचिव प्रीती सुदान यांनी ही माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गाचा एखही रूग्ण आढळला नाही किंवा गेल्या २१ दिवसांपासून ज्या जिल्ह्यात संसर्ग आढळून आलेला नाही, अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. मागील १४ दिवसांत ज्या ठिकाणी नव्याने संसर्गाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही, असे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर रेड झोन अथवा कंटेनमेंट झोनमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने रूग्ण आढळून आले आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचाः राजकीय पेच सुटलाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ मे रोजी होणार विधान परिषदेचे आमदार!

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वर्गवारी अशीः
रेड झोनमधील जिल्हेः
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर.

ऑरेंज झोनमधील जिल्हेः  रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदूरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड.

ग्रीनझोनमधील जिल्हेः उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा.

राज्यनिहाय रेड झोन जिल्ह्यांची संख्या अशीः महाराष्ट्रः१४, दिल्लीः११, तामिळनाडूः १२, उत्तर प्रदेशः १९, पश्चिम बंगालः १०, गुजरातः ९, मध्य प्रदेशः ९, राजस्थानः ८

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा