पैसे मोजा आणि हवा तेवढा गहू-तांदूळ घेऊन जाः केंद्र सरकारचा राज्य सरकारांसाठी निर्णय

1
470

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांबरोबरच राज्य सरकारांचेही आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांची अन्नधान्याची अतिरिक्त गरज भागवण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून २२ रुपये ५० किलो दराने थेट तांदूळ खरेदी करण्याची मुभा दिली आहे. दुसरीकडे, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत न येणाऱ्या नागरिकांची गरज भागवण्यासाठी २१ रुपये किलो दराने गहू आणि २२ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे देशभरात ठिकठिकाणी लक्षावधी स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून हातावर पोट असलेल्या कामगारांच्या कुटुंबाच्याही भरणपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत सर्वाधिक हाल गरिबांच होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांना अतिरिक्त गरज भागवण्यासाठी लिलाव प्रक्रियेत भाग न घेता भारतीय खाद्य निगमकडून थेट २२ रुपये ५० पैसे प्रतिकिलो दराने तांदूळ खरेदीची मुभाही देण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत न येणाऱ्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही राज्य सरकारांना २१ रुपये किलो दराने गहू आणि २२ रुपये किलो दराने तांदूळ विकण्याचा निर्णयही दानवे यांनी ट्विट करून जाहीर केला आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेली राज्ये केंद्र सरकारकडे आर्थिक पॅकेज आणि जीएसटीची थकबाकी मागत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कालच देशातील गोदामांमध्ये साठून पडलेले अन्नधान्य गरिबांची उपासमार टाळण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवा, अशी सूचना केंद्र सरकारला केली होती. राज्य सरकारांनी ठिकठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी निवारा शिबिरे उघडून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे.

एनजीओंनाही २१ रुपये गहू, २२ रुपये किलो दराने तांदूळः दुसरीकडे, गरीब आणि गरजूंची उपासमार टाळण्यासाठी देशातील एनजीओ आणि अन्य कल्याणकारी संघटनांनी पुढाकार घेऊन उपासमार होत असलेल्या या लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांनी या अवघड परिस्थितीत गरीब आणि गरजूंना भोजन उपलब्ध करून देण्यात एनजीओ महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे या संघटनांसाठी २१ रुपये किलो दराने गहू आणि २२ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा