पुण्याची लोकसंख्या, झोपडपट्टी हे कोरोनाचे प्रमाण जास्त असण्याचे कारणः विभागीय आयुक्त म्हैसेकर

केंद्रीय पथकाने सोमवारी पुण्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेतला. या पथकासमोर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सादरीकरण केले.

0
224

पुणेः पुणे विभागात पुणे शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक आहे.  लोकसंख्या आणि झोपडपट्टी हे पुण्यात कोरोना बाधितांचे प्रमाण जास्त असण्याचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यात ५५ ते ७० वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक आहे, असे सादरीकरण पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी केंद्रीय पथकासमोर केले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने सोमवारी पुण्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने कोरोना बाधित रूग्ण आणि मृत्यूचे प्रमाण याबाबतची माहिती जाणून घेतली. या पथकातील केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशिष गवई, आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक पी.के.सेन हे उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय पथकाने जाणून घेतली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे. एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये ५५ ते ७० वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय बहुतांश लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरूवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे, असे म्हैसेकर म्हणाले.

जिल्हा, मनपा, आरोग्य व पोलीस प्रशासन हे संयुक्तपणे हातात हात घालून काम करीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. काही दिवसांत परिस्थिती निश्चित नियंत्रणात येईल, असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम् यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आमच्या भागात उद्योग व आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचे सांगितले. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व अपर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती देताना शहरातील रुग्णालय सक्षम केले असून काही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. भविष्यात कोरोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी, अशा पध्दतीने नियोजन केले असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ससून रुग्णालय अंतर्गत अकरा मजली इमारतीत नव्याने कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत सुरू केले. आरोग्याबरोबरच अडकून असलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण भागाची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्न–धान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मलहोत्रा यांनी शेवटी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा