मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने बंद

0
135

मुंबईः कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, मी काल केलेल्या आवाहनानुसार गर्दी बरीच कमी  झालेली आहे. संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागणार आहेत. रेल्वे- बस या शहराच्या रक्तवाहिन्या आहेत. त्या बंद केल्या तर डॉक्टर, परिचारिका, रूग्णालयीन कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांची ने- आण कशी करणार? त्यामुळे तूर्त या दोन सेवा बंद न करता मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या महापालिका क्षेत्रातील जीवनावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने, कार्यालये बंद करण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत ही बंदी राहील. किराणा दुकाने, दूध, बँका आदी जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीः शासकीय कार्यालयात आता ५० टक्के ऐवजी २५ टक्के उपस्थिती लागू करण्यात आली आहे. आम्ही वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून द्या, असे आवाहन महाराष्ट्रातील सर्वांना केले होते. हे आवाहन करूनही जी कार्यालये सुरूच आहेत, त्यांना नाईलाजाने बंद करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. जी कार्यालये आणि संस्था बंद होतील, तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करू नये. ज्या कर्मचाऱ्यांचे हातावर पोट आहे, त्यांनी करायचे काय? त्यामुळे माणुसकीच्या नात्याने कर्मचाऱ्यांची वेतन कपात करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

ही फिरण्याची सुटी नाहीः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या चार प्रमुख महानगरातील सर्व कार्यालये आणि दुकाने बंद करण्यात येत असली तरी ही फिरण्याची सुटी नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण घरात बसून ही लढाई जिंकायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा