कोरोनाचा संसर्गः प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करा तुमच्या शंकांचे समाधान

0
60

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. तसे कोरोनाच्या बाबतीत लोकांच्या मनात काही गैरसमजही निर्माण होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांच्या मनातील शंकांचे समाधान करण्यासाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शास्त्रीय माहिती दिली आहे. जाणून घेऊ या तुमच्या मनातील प्रश्न आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे…

उन्हाळा आल्याने किंवा आपण उष्ण कटिबंधात असल्याने करोना विषाणूला रोखण्यास मदत मिळेल?
तथ्य:
आतापर्यंतच्या अहवालानुसार, करोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या क्षेत्रासह सर्व क्षेत्रात पसरू शकतो.आपण राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित भागातून प्रवास करत असाल तर संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करा. कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. असे केल्याने आपण आपल्या हातावर असलेल्या विषाणूंचा नायनाट करतो आणि आपले नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श करून उद्भवणारे संक्रमण टाळतो.

गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे नवीन करोना विषाणू आजार रोखता येईल?
तथ्य:
आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते, या तापमानात हे विषाणू आपल्या शरीरात संचार करू शकतात आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होत नाही. गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपली कोविड-१९ पासून सुरक्षा होत नाही. आपल्या आंघोळीच्या पाण्याचे तापमान कितीही असो, मात्र आपल्या शरीराचे सामान्य तापमान ३६.५ ते ३७ अंश सेल्सिअस इतके असते. खरे पाहता, अत्यंत गरम पाण्याने आंघोळ करणे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते.

कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. असे केल्याने आपण आपल्या हातावर असलेल्या विषाणूंचा नायनाट करतो आणि आपले नाक, तोंड, व डोळ्यांना स्पर्श करून उद्भवणारे संक्रमण टाळतो.

कच्चे लसूण, तीळ खाल्ल्याने विषाणूपासून आपला बचाव होईल का?
तथ्य:
लसूण हा आरोग्यदायी पदार्थ आहे, त्याचे असे अनेक फायदे आहेत. परंतु लसूण खाल्ल्याने लोकांना नवीन करोना विषाणूपासून (२०१९-कोविड) संरक्षण मिळत नाही.

न्यूमोनियाविरुद्ध वापरण्यात येणारी लस नवीन करोना विषाणूपासून आपले रक्षण करेल का?
तथ्य:
न्यूमोनियाविरुद्ध देण्यात येणारी लस तुमचे न्यूमोनियापासून नक्कीच संरक्षण करील. परंतु न्यूमोनियाविरुद्ध देण्यात येणाऱ्या लसीमध्ये नोवल करोना विषाणूविरुद्ध लढण्याची क्षमता नाही. न्यूमोनियाविरुद्धची लस, जसे की न्यूमोकोकल लस आणि हेमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी (एचआयबी) लस ही नवीन करोना विषाणू विरुद्ध आपल्याला संरक्षण पुरवत नाही. हा विषाणू इतर विषाणूंपेक्षा नवीन आणि वेगळा आहे, त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र अशी लस आवश्यक आहे. संशोधक कोविड-१९ ला रोखण्यासाठी लस विकसित करत आहेत व डब्ल्यूएचओ ही संस्था त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन करत आहे.  या लसी कोविड-१९ विरुद्ध जरी प्रभावी नसल्या तरी आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी श्वसनासंबंधी आजारांविरुद्ध लसीकरण करण्याची अत्यंत शिफारस केली जाते.

नवीन करोना विषाणूला रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी काही विशिष्ट औषधे आहेत का?
तथ्य:
अद्याप, नवीन करोना विषाणूला (कोविड-१९) रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट औषधाची शिफारस केलेली नाही. परंतु करोना विषाणूची लागण झालेल्यांच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि गंभीर आजार असलेल्यांना रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात यावे. तसेच यावर काही विशिष्ट उपचारांची तपासणी चालू असून क्लिनिकल चाचण्यांद्वारे परीक्षण केले जात आहे.

नवीन करोना विषाणूला रोखण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी प्रतिजैविके प्रभावी आहेत का?
तथ्य:
नाही. प्रतिजैविके विषाणू विरुद्ध लढू शकत नाही, फक्त जीवाणू (बॅक्टेरिया) विरुद्ध लढू शकतात.  नवीन करोना विषाणू (कोविड-१९) हा एक विषाणू आहे आणि म्हणूनच, प्रतिजैविकांचा उपयोग रोखण्यासाठी किंवा उपचारासाठी केला जाऊ शकत नाही.परंतु, आपण कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले असाल तर जीवाणू (बॅक्टेरिया) सह-संसर्गाच्या उपचारासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जाऊ शकतो.

डासांचा दंशाद्वारे आपल्याला कोविड-१९ ची बाधा होऊ शकते?
तथ्य:
करोना विषाणू डासांच्या दंशाद्वारे पसरू शकत नाही. नवीन करोना विषाणू डासांद्वारे पसरू शकतो हे सांगणारी माहिती किंवा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. नवीन करोना विषाणू हा श्वसनासंबंधी विषाणू आहे, जो प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून किंवा लाळेच्या थेंबातून किंवा नाकातील स्रावाद्वारे पसरतो.

आपल्या संपूर्ण शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरिनवर आधारित द्रव लावल्याने करोना विषाणूला रोखता येऊ शकते का?
तथ्य:
आपल्या संपूर्ण शरीरावर / कपड्यांवर अल्कोहोल किंवा क्लोरीनवर आधारित द्रव लावणे किंवा मद्यपान  करणे आपल्याला करोना विषाणूची बाधा होण्यापासून वाचवू शकत नाही. नाक किंवा तोंडावाटे विषाणू आपल्या शरीरात जेव्हा शिरकाव करतात तेव्हा आजार पसरला जातो. जेव्हा आपण दूषित हाताने तोंडाला स्पर्श करतो किंवा अन्न खातो तेव्हा बाधा होण्याची शक्यता अधिक असते, म्हणूनच वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुवा; जेणेकरून आपण विषाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकतो. अल्कोहोल किंवा क्लोरीनवर आधारित द्रव एखादा पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, परंतु योग्य शिफारशीनुसार त्यांचा वापर आवश्यक आहे.

मिठाच्या द्रावाने (सलाईन) नियमितपणे नाक साफ केल्यास संसर्ग टाळता येईल?
तथ्य:
नाक सलाईनद्वारे सातत्याने साफ केल्याने सर्दी लवकर बरी होण्यास मदत मिळते असे काही प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. परंतु नोवल करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल असा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

नवीन करोना विषाणूला रोखण्यास हँड ड्रायर प्रभावी आहेत का?
तथ्य:
नाही. कोविड-१९ ला रोखण्यास हँड ड्रायर्स प्रभावी नाहीत. नवीन करोना विषाणू संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. आपले हात स्वच्छ धुतल्यानंतर कागदी टिश्यू पेपर किंवा वॉर्म एअर ड्रायरच्या सहाय्याने हात पूर्णपणे कोरडे करून घेणे.

नवीन करोना विषाणूपासून संसर्ग झालेल्या लोकांना शोधण्यासाठी थर्मल स्कॅनर किती प्रभावी आहे?
तथ्य:
नवीन करोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्या व्यक्तींना ताप आला आहे (म्हणजेच शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त) हे शोधण्यासाठी थर्मल स्कॅनर प्रभावी आहे. परंतु थर्मल स्कॅनर तापाने आजारी नसलेल्या लोकांना शोधू शकत नाहीत. याचे कारण असे कि संक्रमण झाल्यानंतर आजाराची लक्षणे दिसून येण्यासाठी २ ते १० दिवसांचा कालावधी लागतो.

एखादा अल्ट्राव्हायोलेट निर्जंतुकीकरण दिवा नवीन करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदतगार ठरू शकतो का?
तथ्य:
अल्ट्राव्हायोलेट दिव्यांचा वापर हात किंवा शरीराचे इतर अवयव निर्जंतुक करण्यासाठी करू नये; जर केल्यास अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्वचेला त्रास होऊ शकतो.

नवीन करोना विषाणूमुळे वृद्ध लोकांवर परिणाम होतो का किंवा युवावर्ग देखील सहज प्रभावित होऊ शकतो का?
तथ्य: नवीन करोना विषाणू (कोविड-१९) ची सर्व वयोगटातील लोकांना बाधा होऊ शकते. वृद्ध लोक आणि ज्यांना अगोदरपासूनच आजार आहेत (जसे दमा, मधुमेह, हृदयविकार) असे लोक या विषाणूमुळे गंभीर आजारी पडण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटना सर्व वयोगटातील लोकांना स्वतःला विषाणूपासून संरक्षित ठेवण्यासाठी संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देत आहे. उदारणार्थ, हाताची स्वच्छता राखणे व श्वसनासंबंधीचे शिष्टाचार यांचे पालन करणे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा