हे युद्ध आहे, फक्त सरकारच्याच सूचना पाळाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

0
146
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात कोरोनाविरुद्धचे युद्ध सुरू झाले आहे. युद्ध म्हटल्यावर ते घाबरून लढता येत नाही. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळा आणि सरकारने जारी केलेल्या सूचना पाळा, अन्य कोणत्याही सूचनांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राला संबोधित केले. गेले काही दिवस एक वेगळे जागतिक युद्ध संपूर्ण देश लढतो आहे. आम्ही दिलेल्या सूचना तुम्ही पाळत आहात. तुमचे सहकार्य हेच आमचे बळ आहे.  आपल्याकडे संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. युद्ध भितीने किंवा घाबरून लढता येत नाही. युद्ध म्हटल्यानंतर युद्धाचे अनुभव वाईट असतात हे लक्षात घ्या, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी १९७१ च्या युद्धाचीही आठवण सांगितली. युद्ध म्हटल्यानंतर शत्रूच्या विमानांना आपली वस्ती दिसू नये, म्हणून खबरदारी घेतली जात होती. भोंगे वाजले की लोक घरातील दिवे बंद करत होते. घराबाहेर पडत नव्हते. १९७१ च्या युद्धात मुंबईपर्यंत शत्रूची विमाने आली होती, असे म्हणतात. पण आपले जवान बहाद्दर आहेत. त्यांनी ते परतून लावले. युद्ध सुरू झाले आहे. भोंगा वाजला आहे. त्यामुळे सूचना पाळा. जेव्हा आम्ही सांगतो की, घराबाहेर पडू नका. अनावश्यक प्रवास टाळा, त्याचवेळी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कोरोनाशी युद्ध लढत आहे. अशावेळी आपण घरात राहू शकत नाही का?, असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे.

 अजूनही अनावश्यक प्रवास सुरू आहे. रेल्वे, बसची गर्दी कमी करा. त्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकते. पण ती वेळ आणू नका. कालच मी सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. आता दिवसाआड किंवा आठवड्याआड असा निर्णय घेतो आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आपण सर्व मिळून हे युद्ध लढत आहोत. हे युद्ध म्हटल्यानंतर ते जिद्दीने लढावे लागते. या यंत्रणेवरचा भार कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्यावरचा भार जेवढा हलका होईल, तेवढी त्यांची कार्यक्षमता वाढेल. ज्या सूचना सरकार जारी करते, तेवढ्याच पाळा. अन्य कोणत्याही सूचनांवर विश्वास ठेवू नका, असेही ठाकरे म्हणाले. शिवरायाच्या लढणारा महाराष्ट्र या संकटावर नक्की मात करेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा