पुढचे १५-२० दिवस अत्यंत कसोटीचे-परीक्षेचे, घरातच रहाः मुख्यमंत्री ठाकरेंचे पुन्हा आवाहन

0
114
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पुढचे पंधरा- वीस दिवस हे अत्यंत कसोटीचे आहेत, परीक्षेचे आहेत. ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणीही थोपवू शकणार नाही. संकट घराबाहेर आहे, घरात नाही. त्यामुळे घरातील वातावरण पॉझिटिव्ह ठेवा आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा केले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा संवाद साधला. हे एक संकट आहे. संपूर्ण देश, विश्व या संकटाने ग्रासून टाकले आहे. त्यामुळे आपण जेथे आहात, तेथेच थांबा. कोणीही कुठेही जायचा प्रयत्न करू नका. सरकारने पूर्ण जबाबदारी घेतली आहे. खबरदारी घेतली आहे. आपण फक्त ज्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत, त्या तंतोतंत पाळा. तुम्ही त्या आतापर्यंत पाळत आलेलाच आहात, असे ठाकरे म्हणाले.

माणूस जगवायचा म्हणजे माणुसकी जपली पाहिजे. माणुसकी हा मोठा धर्म येला आपल्याला उपयोगी पडतो आहे. राज्यभरातील शिवभोजन केंद्रे आता दोन तासांऐवजी तीन तास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची क्षमता सुद्धा एक लाखाने वाढवण्यास सांगितले आहे. पण याचा अर्थ तीन तास म्हटले म्हणजे तिकडे जाऊन गर्दी करणे असा नाही. तेथे जेवायला गेल्यावर अंतर ठेऊन बसा. एकमेकांना संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे ठाकरे म्हणाले.

 आपल्याकडे काही केसेस वाढत आहेत. पण त्याचबरोबर एक दिलासा देणारी माहिती मी सांगू इच्छितो की, जे लोक वेळेमध्ये आले ते आता बरेचसे व्यवस्थित आहेत आणि त्यातील काही जणांना पूर्ण बरे होऊन आपण घरी पाठवत आहोत. डॉक्टर्स, सिस्टर, वॉर्डबॉय सगळेच कमाल करत आहेत. त्यांचे उपकार कसे मानावे हा एक मोठा प्रश्न आहे. ते अहोरात्र मेहनत करत आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या आईवडिलांची गरज आहे. पण ते कशाचीही पर्वा न करता आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

रस्त्यावरची गर्दी कमी झाली आहे. परंतु अजूनही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की घरातच रहा. घरात सतत हात धुवा. असे म्हणा की, या संकटाच्या मागे आपणाला हात धुवून लागायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा