कोरोनाचे संकटः आगामी आठवडे-महिने भारताच्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक!

0
663

नवी दिल्लीः भारताने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली किंवा जिंकणारच आहे, अशा भ्रमात असलेल्यांच्या पदरी प्रचंड निराशा पडण्याची शक्यता आहे. आगामी आठवडे आणि महिने भारताच्या इतिहासातील सर्वाधिक आव्हानात्मक असतील. चीन आणि इटलीमध्ये ४० दिवसांच्या लॉकडाऊननंतर कोरोना संसर्गाचा वेग मंदावला होता. भारतात त्याच्या उलट होत आहे. येथे हा वेग वाढतच चालला आहे, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांना ‘द वायर’साठी दिलेल्या मुलाखतीत डॉ. गुलेरिया यांनी हा इशारा दिला आहे. शनिवारी रात्री ही मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. लॉकडाऊन लागू करूनही भारतातील कोरोना संसर्गाचा आलेख वाढणे थांबलेले नाही. तो सातत्याने वाढतच चालला आहे. संसर्ग वाढला आहे. त्याचा वेगही वाढला आहे. केंद्र सरकारला कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाबाबत जे काही वाटले होते, तसे झालेले नाही. आगामी काही आठवडे आणि महिने भारतासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असतील, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

गणितीय मॉड्यूल फेलः लॉकडाऊन लागू केला नसता तर भारतात १४ लाख ते २९ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता आणि जवळपास ३७ हजार ते ७८ हजार लोकांचा मृत्यू झाला असता, असा दावा केंद्र सरकारने एका गणितीय मॉड्यूलच्या आधारे केला होता. त्याबाबत डॉ. गुलेरिया म्हणाले की, गणितीय मॉड्यूल काही पूर्वानुमान आणि ढोबळ आकलानावर तयार केले जातात. वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळेच जे मॉड्यूल तयार करण्यात येतात, त्याचे परिणाम नेहमीच खरे नसतात. ते चुकीचेही ठरू शकतात. अमेरिकेत अशा प्रकारचे गणितीय मॉड्यूलचे निष्कर्ष सपशेल चुकीचे सिद्ध झाले आहेत. भारताने कोरोनावर विजय मिळवला, असा दावा करणे घाईचे ठरेल. हे युद्ध अजून सुरू आहे. कारण परिस्थिती कायम बदलत असते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. आगामी काही महिने आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक आव्हानात्क असतील, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

इतर देशांशी तुलना चुकीचीः भारताने आपल्या मर्यादेत राहूनच कोरोनाशी लढाई केली पाहिजे. अमूक देशाच्या तुलनेत भारताने किती चांगले काम केले आहे, असे दावे करण्याच्या फंदात पडू नये, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी एका पत्रकार परिषदेत भारताची तुलना जगातील सर्वाधिक कोरोना बाधित १५ देशांशी केली होती आणि त्या १५ देशांच्या तुलनेत भारताने किती चांगले काम केले आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा