औरंगाबादेत कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरूवात, आता कोणालाही लागण होण्याचा धोका!

1
32268
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाला सुरूवात झाली असून या पुढे सार्वजनिक आरोग्य उपाययोजना म्हणून लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा फारसा उपयोग होणार नाही, असा निष्कर्ष शहरात करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे फक्त ११. ८१ टक्केच लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज आढळून आल्यामुळे औरंगाबादकरांवरील कोरोना संसर्गाचे गंभीर संकट अधिकच गडद झाले आहे.

 औरंगाबाद शहरात १० ते १६ ऑगस्टदरम्यान कोरोना सेरो सर्वेक्षण करण्यात आले. शहराच्या सर्व ११५ वॉर्डांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात नमुने घेण्यात आले होते. या सर्वेक्षणात १० ते १७ वयोगटातील मुलांचाही ३० क्लस्टर पद्धतीने अभ्यास करण्यात आला आहे.

हेही वाचाः कोरोनानेही दाखवली जातः औरंगाबादेत २४.९६ % मुस्लिमांत अँटिबॉडीज, हिंदूंचे प्रमाण ८.९६ टक्केच!

 या सर्वेक्षणाअंती काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, हे सर्वेक्षण संपूर्ण शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकसंख्येचे करण्यात आल्यामुळे कोरोनाचे सामाजिक संक्रमण होत आहे. त्यामुळे या पुढे लॉकडाऊनसारख्या उपायांचा फारसा उपयोग होणार नाही. मास्क वापरणे, वारंवार साबण- पाण्याने हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे या उपायांची कडक अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही.
हेही वाचाः औरंगाबादेत विनामास्क फिरणाऱ्यांना रोख दंडासह मिळणार मास्क!

औरंगाबाद शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षणीयरित्या कमी होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यताही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात व्यक्त करण्यात आली आहे. आणखी काही दिवसांनंतर सेरो सर्वेक्षण केल्यानंतरच त्याविषयी खात्रीने सांगता येईल, असे हे सर्वेक्षण सांगते.

औरंगाबाद शहरातील केवळ ११.८१ टक्केच लोकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. झोपडपट्टीच्या लोकसंख्येत हे प्रमाण १४.५६ टक्के आहे तर इतर लोकसंख्येत १०.६४ टक्के आहे. सिल्लेखाना- नूतन कॉलनी वॉर्डात सर्वाधिक ६३.३ टक्के अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. तर सर्वात कमी ३९. ४ टक्के अँटीबॉडीज निझामगंज- संजयनगर वॉर्डात आढळून आल्या आहेत. जय विश्वभारती कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी-शास्त्री नगर, संत ज्ञानेश्वरनगर, जटवाडा रोड वॉर्डात शून्य टक्के अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

 कोणालाही आणि कधीही संसर्गाचा धोकाः सेरो सर्वेक्षणात सरासरी ६० ते ६५ टक्के लोकसंख्येत अँटीबॉडीज आढळून आल्या तरच त्या शहरातील लोकसंख्येला कोरोना संसर्गाचा धोका असत नाही, असे मानले जाते. पुण्यामध्ये करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात तेथील ५० टक्के लोकसंख्येमध्ये कोरोना विरोधी अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या. औरंगाबादेतील हे प्रमाण अवघे ११.८१ टक्के असल्यामुळे कोणालाही आणि कधीही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

गाफिल राहू नकाः हे सर्वेक्षण संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसंख्येत केलेले असल्याने असे म्हणता येते की कोविड रोगाचे सामाजिक संक्रमण होत आहे आणि त्यामुळे यापुढे सार्वजनिक आरोग्य उपाय योजना म्हणून लॉकडाऊनसारख्या उपायांचा फारसा उपयोग होणार नाही. मात्र मास्क वापरणे, वारंवार साबण-पाण्याने हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे ह्या उपायांची कडक अमलबजावणी आवश्यक आहे. काही भागांमध्ये जरी बऱ्याच लोकांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली असली तरी सर्व शहरवासियांनी गाफील राहून चालणार नाही.
– सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

एक प्रतिक्रिया

  1. कोरोनाच्या संसर्गापासुन विविध उपाय योजनेसोबतच एकुण 115 वार्डांमध्ये “कोरोना रक्षक दल”सामाजिक, राजकीय तरुणांना संधी देऊन कोरोना विरोधात जनजागृती करण्यासाठी”लोक चळवळ”उभी केली पाहीजे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा