इंग्लंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, ५ कोटी नागरिक पुन्हा घरात!

0
1015
संग्रहित छायाचित्र.

लंडनः ब्रिटनमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनचा झपाट्याने फैलाव होऊ लागल्यामुळे ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बुधवारपासून हा लॉकडाऊन लागू होणार असून तो फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहे. दरम्यान स्कॉटलंडनेही स्टे ऍट होम आदेश जारी केले असून १८ जानेवारीपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.  इंग्लंडची लोकसंख्या ५.६ कोटी आहे.

नवा कोरोना स्ट्रेन वेगाने हातपाय पसरू लागल्यामुळे ब्रिटनमध्ये हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्यामुळे आगामी आठवडा सर्वात कठीण असेल, असे जॉनसन यांनी म्हटले आहे. आता लागू केलेला लॉकडाऊन मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनप्रमाणेच कठोर असेल. सर्व शाळा महाविद्यालये बंद असतील आणि लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत चार सर्वोच्च प्राधान्यक्रमाच्या गटांना कोरोना लसीचा पहिला डोज दिला जाईल. ७० वर्षांवरील सर्व नागरिक, फ्रंटलाइन आरोग्यसेवा आणि सामाजिकसेवा कर्मचारी आणि अतिजोखमीच्या लोकांना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोना लसीचा पहिला डोज दिला जाईल, असे जॉनसन यांनी म्हटले आहे.

डाऊनिंग स्ट्रीटवरून देशातील जनतेला संबोधित करताना जॉनसन यांनी लोकांना नव्या लॉकडाऊनच्या नियमाचे बुधवारी कायद्यात रुपांतर होण्याआधीच तातडीने पालन करण्याचे आवाहनही केले आहे. देश संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यातून जात आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा प्रचंड दबाव वाढला आहे, असेही जॉनसन म्हणाले. घरी रहा आणि स्वतःच्या जिविताचे रक्षण करा, अशी घोषणाही त्यांनी केली.

आताचा लॉकडाऊन मार्च ते जून या तीन महिन्यांत लागू केलेल्या लॉकडाऊनसारखाच कठोर असेल. या लॉकडाऊनमध्ये शाळा-महाविद्यालये बंद असतील. घराबाहेर पडण्यावर निर्बंध असतील. शक्यतो घरातून काम करा. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी, वैद्यकीय सेवा पुरवठा आणि व्यायामासाठी घराबाहेर पडण्याची मात्र सूट असेल.

इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आर्यंलंडच्या चार मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ब्रिटनमधील कोरोना संसर्गाचा स्तर उच्चतम पातळीच्या पाचव्या टप्प्यावर पोहोचला असल्याचे सांगितल्याच्या काही वेळातच जॉनसन यांनी लॉकडाऊनची ही घोषणा केली आहे. संसर्गाचा स्तर उच्चतम पातळीच्या पाचव्या टप्प्यावर पोहोचणे म्हणजे जर काही पावले उचलली नाहीत तर २१ दिवसांत राज्यातील राष्ट्रीय आरोग्यसेवा धोक्यात येईल, असा त्याचा अर्थ होतो.

या लॉकडाऊनमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येण्यावर बंदी असेल, त्यांना ऑनलाइन शिकवले जाईल. रेस्टॉरंट्स खुले राहतील, मात्र त्यांना फक्त पार्सल देता येईल. गोल्फ कोर्स, टेनिस कोर्ट्स आणि जिम बंद राहतील. मात्र खेळाची खुली मैदाने सुरु राहतील.ब्रिटनमध्ये सध्या दररोज ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी ब्रिटनमध्ये ५८ हजार, रविवारी ५५ हजार आणि शनिवारी ५७ हजार कोरोना रुग्ण आढळून आले होते.

भारतात खबरदारीः दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनचे भारतातही ३८ हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून जास्तीची खबरदारी घेण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते ज्या विमानतळावर उतरतील, त्यांना तेथेच क्वारंटाइन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा