मोदीजी, गप्पा खूप झाल्या ‘या सप्तपदी’ची देशाला उत्तरे द्याः काँग्रेसचे मोदींना खुले आव्हान

0
723

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासियांकडून  केलेल्या सप्तपदीच्या काटेकोर पालनाच्या अपेक्षेवरून काँग्रेसने जोरदार टिकास्त्र सोडले आहे. गप्पा खूप झाल्या पण कोरोनाशी लढण्याचा रोडमॅप काय आहे? असा सवाल करत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना सात प्रश्न विचारले असून देशाला या सप्तपदीची उत्तरे द्या, असे आव्हान दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या देशाला उद्देशून केलेल्या संबोधनानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. देशाला आज या सात गोष्टींचीय सप्तपदीची उत्तरे हवी आहेत, असे सांगत सुरजेवाला यांनी मोदींसमोर सात प्रश्नांची जंत्रीच ठेवली आहे. ती अशीः

  • देशाने २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळला. देश २० दिवसांचाही लॉकडाऊन पाळेल. परंतु नेतृत्वाने काम फक्त देशवासियांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणेच नव्हे तर सरकार आणि शासकाचे जनतेप्रती असलेले उत्तरदायीत्व आणि जबाबदारीचे निर्वहन करणेही आहे. गप्पा खूप झाल्या, कोरोनाशी लढण्याचा तुमचा रोडमॅप काय आहे?
  • कोरोनाविरुद्ध आघाडीवर लढणारे योद्धे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि सफाई कामगार आहेत. त्यांना आजपर्यंत एन-९५ मास्क आणि पीपीई किटचा प्रचंड तुटवडा आहे. या मुद्यावर आपण गप्प का? हे सुरक्षा कवच कधी उपलब्ध होणार?
  • स्थलांतरित झालेले कोट्यवधी मजूर आज रोजी-रोटीच्या संकटाचा सामना करत आहेत. या संवेदनशील व मानवीय मुद्यावर तुमची काय कृती योजना आहे?
  • लाखो एकर गहू, रबीचे पिक काढणीसाठी तयार आहे. पण त्याची व्यवस्था का नाही? वेळेवर काढणी आणि हमी भावाने शेतमालाची खरेदी सुनिश्चित करण्याबाबत तुम्ही गप्प का आहात? देशाचा अन्नदाता आणि शेती तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीबाहेर का आहे?
  • कोरोनाच्या संकटाआधीच देशातील तरूण अभूतपूर्व बेरोजगारीच्या संकटाचा सामना करत होता. आता बेरोजगारी, नोकर करात आणि नोकऱ्या जाण्याचा दर आक्राळ विक्राळ रुप धारण करत आहे. तुमचा ‘कोविड-१९ इकॉनॉमिक रिकव्हरी टास्क फोर्स कुठे गायब आहे? कोट्यवधी तरूणांनी कुठे जायचे?
  • देशाचा आर्थिक कणा असलेला दुकानदार, लघु आणि मध्यम उद्योग आज बुडतीच्या वाटेवर आहेत. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार याच क्षेत्रात आहे. हे परत रूळावर आणण्यासाठी आणि आर्थिक मदत देण्याबाबत तुमची काय कृती योजना आहे?
  •  कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जगाने कोट्यवधी- अब्जावधी रुपयांचे आर्थिक पॅकेज लागू केले आहेत. या यादीत तुमचे सरकार शेवटच्या क्रमांकावर का आहे? नियत आणि नीतीचा अभाव देशाला भारी पडू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा