मुंबईः काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना २५ मे रोजी मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दोन आठवडे मुंबईत थांबून नांदेडमध्ये परतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यांना २४ मे रोजी नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून २५ मे रोजी रूग्णवाहिकेने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. मुंबईच्या लिलावती रूग्णालयात गेले १० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
चव्हाण यांना आज लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहेत. येथेच पुढील १४ दिवस ते होम क्वारंटाइन राहणार आहेत. कोरोनाची लागण झालेले अशोक चव्हाण हे महाविकास आघाडी सरकारमधील दुसरे मंत्री आहेत. त्यांच्या आधी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती.