कोरोनाः लॉकडाऊनच्या एक दिवस आधी फक्त ८२ जिल्ह्यांत संसर्ग, आजघडीला ५५० जिल्ह्यांत फैलाव!

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधित रूग्णांची संख्या १ लाख १ हजार १३९ वर पोहोचली असून ३ हजार १६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

0
128

नवी दिल्लीः देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख १ हजार १३९ झाली आहे तर ३ हजार १६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.केंद्र सरकारने आज त्याची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा देशातील कोरोना बाधितांची संख्या फक्त ५६४ होती. पहिला लॉकडाऊन सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २३ मार्च रोजी देशातील फक्त ८८ जिल्ह्यांतच कोरोनाचा विषाणूचा फैलाव झाला होता. आजघडीला लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांपर्यंत ५५० जिल्ह्यांत कोरोनाच्या संसर्गाने हातपाय पसरलेले आहेत.

देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या ५५ दिवसांच्या कालावधीत देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने ५६४ वरून १ लाखाच्या वरचा आकडा गाठला आहे. प्रारंभीच्या काळात कोरोनाचा संसर्ग शहरी भागांपुरताच मर्यादित होता. आता तो ग्रामीण भागातही फैलावला आहे. लॉकडाऊन-३ सुरू होण्याच्या आधी देशातील सुमारे ३७० जिल्हे कोरोना विषाणूच्या संसर्गाने प्रभावित झाले होते. परंतु अवघ्या पंधरवड्यातच जवळपास ५५० जिल्ह्यांत हा फैलाव झाला आहे. यात ग्रामीण भागांतील जिल्ह्यांचाही समावेश आहे. शहरी भागातील स्थलांतरित मजूर देशाच्या विविध भागात आपापल्या राज्यात परतल्यामुळ ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचाः ‘मोदींचा मनरेगावर यू-टर्न’: यूपीएच्या अपयशाचे स्मारक संबोधले, त्याचसाठी दिले ४० हजार कोटी!

२५ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन सुरू झाला, त्या दिवशी देशातील कोरोना बाधितांची ६५० प्रकरणे आढळी होती. पहिला लॉकडाऊन संपला तेव्हा १४ एप्रिलपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या ११ हजारांवर पोहोचली. दुसरा लॉकडाऊन संपला तव्हा ३ मेपर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ४२ हजारांवर गेली. तिसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपला तेव्हा १७ मेपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या ९५ हजारांहून अधिक झाली. चौथ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ही संख्या १ लाखांवर पोहोचली आहे.

हेही वाचाः जावई शहरातून कुटुंबासह सासूरवाडीत गेला अन् पत्नी- दोन मुलांसह पॉझिटिव्ह निघाला!

देशात ३० जानेवारी रोजी कोरोना संसर्गाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासून सोमवार, १८ मेपर्यंत कोरोना बाधितांची संख्या एक लाखांवर आणि या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या ३ हजार १६३ वर पोहोचली आहे. भारतात कोरोनाचा मृत्यूदर ३.०७ टक्के आहे. देशात या संसर्गाची बाधा झाल्याचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनंतर कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या उपाययोजना म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सध्या या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे.

हेही वाचाः …तर लॉकडाऊन कायम ठेवण्याचा वाईटपणा घ्यायलाही मी तयारः मुख्यमंत्री ठाकरे

जागतिक पातळीवर तुलना केली तर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव होणाऱ्या देशांच्या यादीत भारत सध्या ११ व्या क्रमांकावर आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारताने चीनला कधीच मागे टाकले आहे. आता भारत इराणच्याही पुढे निघून जाण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. इराणमध्ये १ लाख २२ हजार लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. जगभरात आतापर्यंत ४८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ३ लाख २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक १५ लाख ५० हजार लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे तर आजवर ९१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा