औरंगाबादेत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५५८, आजपर्यंत ७३ रूग्ण कोरोनामुक्त!

0
95

औरंगाबाद :  औरंगाबाद शहरातील नूर कॉलनीतील दोन मुले, दोन महिला, एक पुरूष, चिकलठाणा एमआयडीसी, भीम नगर आणि संजय नगरातील प्रत्येकी एक पुरूष असे एकूण आठ  कोरोना बाधित रूग्ण बरे झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्यांना आज सुटी देण्यात आली. शहरातील आतापर्यंत ७३ जण कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने सांगितले.

महापालिकेच्या कोविड केअर केंद्रांवरून १३ जण बरे झाल्याने त्यांना काल सुटी देण्यात आली. कालपर्यंत एकूण ६५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. त्यात आज पुन्हा आठजणांची भर पडल्याने ७३ जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, आज औरंगाबाद शहरातील विविध भागातील ५० रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५८ झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये ३२ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यामध्ये रामनगरमधील (१९, सिल्क मिल कॉलनीतील ८, रोहिदासनगरातील २, वसुंधरा कॉलनी, सिडको एन-७ मधील १, चंपा चौकातील ५, दत्ता नगरातील१, संजय नगरातील १, अभयपुत्र कॉलनी-समता नगरातील १, न्याय नगर गल्ली नंबर ७ मधील ५, आसेफिया कॉलनीतील १, बेगमपुऱ्यातील ५ आणि उस्मानपुऱ्यातील गुरूद्वाराजवळील १ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयात ८९ कोरनाबाधितः जिल्हा सामान्य रूग्णालयात आज ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. ४६ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात ८९ कोरोना बाधितांवर विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, असेही जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने कळवले.

 घाटीत ४३ जणांवर उपचार सुरू, एकाचा मृत्यूः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत एकूण ४१ रुग्णांची स्क्रीनिंग झाली. त्यापैकी २१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. घाटीच्या डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पीटलमध्ये (डीसीएच) ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी ४१ रुग्णांची स्थिती सामान्य आहे. दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच ३४ कोरोना निगेटिव्ह रुग्णांवरही उपचार सुरु आहेत. एकूण १०  कोरोना निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिलेली आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

पुंडलिकनगरचा रूग्ण घाटीतः उस्मानपुरा येथील गुरुव्दारा जवळील ५६ वर्षीय पुरुष आणि बेगमपुरा येथील २५ वर्षीय पुरुष या रुग्णांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. पुंडलिक नगर येथील ५८ वर्षीय पॉझिटिव्ह पुरुष रुग्णास जिल्हा सामान्य रूग्णालयातून काल घाटीत हलवण्यात आले आहे.

एकाचा मृत्यूः औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील ५० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, किडनीचाही आजार होता, असेही डॉ. येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा