डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लवकरच कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा

0
120

औरंगाबादः  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयानंतर (घाटी) आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही लवकरच कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या  आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी यांनी ही माहिती दिली.  जिल्हानियोजन समितीच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सोयीसुविधा१४ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून घाटीत २४ तास सुरू राहणारी कोरोना तपासणी लॅब कार्यान्वित केली आहे. आता लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कोरोना तपासणी लॅब सुरू केली जाणार असल्याचे चौधरी म्हणाले.

  औरंगाबाद शहरातील ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, अशी ११ ठिकाणे पूर्णपणे सील केली आहेत. या भागांतील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. आजपर्यंत १३०० स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून १ लाख ९० हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घाटीला १४ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यातून घाटीत २४ तास सुरू असणारी लॅब कार्यान्वित केली असून रूग्णांवर उपचार, आवश्यक औषधी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. आता विद्यापीठातही लवकरच कोरोनाची तपासणी लॅब सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही चौधरी यांनी दिली.

मनपा आयुक्‍तांनी मांडला शहराचा लेखाजोखाः महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत सांगितले की, शहरात १३ ठिकाणी फिवर सेंटर सुरू केले आहेत. महापालिकाक्षेत्रात १३०० बेडची व्यवस्था केली आहे. जिल्हा रुग्णालयात २५० तर घाटीमध्ये ४५० बेडची व्यवस्था केली आहे. आजपर्यंत सारीच्या २२८ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. त्यापैकी २१४ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ६ अहवाल येणे बाकी आहेत. तसेच ७०१ जणांना क्वारंटाइन केले असून त्यापैकी १२५ जणांना संस्थात्मक तर ५७६  जणांना घरातच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे, असे पांडेय म्हणाले.

औरंगाबाद  जिल्ह्यांच्या १४ नाक्यांवर २४ तास पहाराः ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. हेच चित्र कायम ठेवण्यासाठी ग्रामीण भागात संचारबंदी प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. ड्रोन तसेच सीसीटीव्हीव्दारे नजर ठेवण्यात येत असून दुध, फळे तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ज्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग पाळले जात आहे. जिल्ह्यातील १४  तपास नाक्यांव्दारे २४  तास पहारा देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या बैठकीत दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा