कोरोनामुक्त झालेली व्यक्तीही सुरक्षित नाही, दुसऱ्यांदा संसर्गाचा धोका कायमः डब्ल्यूएचओ

0
153

जिनिव्हाः ज्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि जे या संसर्गातून मुक्त झाले आहेत, त्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या लोकांना लॉकडाऊन कालावधीत त्यांचे काम करण्याची सवलत देण्याचा विचार काही सरकारे करत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचा हा इशारा आला आहे. अशा लोकांसाठी ‘इम्युनिटी पासपोर्ट’ जारी करण्याचाही काही सरकारांचा विचार आहे. कोरोना संसर्गापासून मुक्त झालेल्या व्यक्ती आता स्वतःलाही धोका नाही आणि आपल्यापासून दुसऱ्यालाही धोका नाही, असे समजून सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मास्क घालण्यासारख्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकतात, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणूविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज म्हणजेच शरीराची प्रतिकार क्षमता विकसित झालेल्या आहेत की नाहीत, याची तपासणी अनेक देशांत केली जात आहे. अशा अँटीबॉडिज आढळून आल्या तर त्या व्यक्तीला आधी कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि आता ती व्यक्ती कोरोना संसर्गापासन मुक्त झाली आहे, याची पुष्टी मिळणार आहे. जर्मनीत अशा प्रकारे अनेक लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत आणि अन्य देशांत अशा तपासण्यांची तयारी सुरू आहे.

जे लोक कोरोनापासून मुक्त झाले आहेत, त्यांच्याच अँटीबॉडीज विकसित झाल्याचा आणि ते कोरोनाच्या पुन्हा संसर्गापासून सुरक्षित असल्याचा सध्या तरी कोणताही पुरावा नाही, असे डब्ल्यूएचओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतात कोरोनापासून मुक्त झालेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीजच्या साह्याने गंभीर कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचाराची तयारी सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी उपचाराला नुकतीच परवानगी दिली आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. दररोज किमान ८० हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. जगभरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणूने २ लाखाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. अशा वेळी डब्ल्यूएचओचा हा इशारा आलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा