मुंबईत हिरानंदानीतील रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाहीः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा

0
375
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः रविवारी रात्री मुंबईच्या हिरानंदानी रूग्णालयात दाखल कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नव्हे तर  मधुमेह आणि अस्थमा या आजारांच्या गुंतागुंतीमुळे झाला, असा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

 एकीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा वाढत चाललेला असताना दुसरीकडे रविवारी रात्री आणखी एका कोरोनाग्रस्त रूग्णाचा मुंबईत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा दोन झाल्याची बेरीजही सांगितली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेला हा खुलासा महत्वाचा आणि दिलासादायक आहे.

‘ कालरात्री हिरानंदानी रूग्णालयात मृत्यू झालेल्या रूग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता. तथापि त्याला असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही.’ असा मोठा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून केला आहे.

राज्यात आणखी ८ नवीन कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्यात डोंबिवलीमध्ये १, मुंबईत १, ठाण्यात एक, सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यात १ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आढळलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली आढळून आलेली ३५ वर्षीय व्यक्ती पेरूचा प्रवास करून आलेली आहे. मुंबईत आढळलेली ३८ वर्षीय महिला आबुधाबीला जाऊन आलेली आहे. खंडाळ्यात आढळलेली ४५ वर्षीय महिलाही दुबईचा दौरा करून आलेली आहे. तर सांगली जिल्ह्याती इस्लामपूर येथील ४ जणांचे कुटुंब सौदी अरेबियाला जाऊन आलेले आहे. या कुटुंबात ३ पुरूष आणि एका महिलेचाही समावेश आहे. नव्याने आढळून आलेल्या या ८ रूग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ९७ वर गेली आहे. गेल्या दोनच दिवसांत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

 दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा