वाजवा रे!: औरंगाबादेत बँड वाजवण्यास सशर्त परवानगी!

0
144
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद :  औरंगाबादेतील बँडबाजावादकांसाठी खुश खबर आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबद जिल्ह्यात बँड वाजवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि कोरोना चाचणी या त्यातील काही अटी आहेत.

बँड पथकातील प्रत्येक व्यक्तीत किमान सहा चौरस फूट या प्रमाणात अंतराची व्यवस्था करावी. पथकातील कलाकार व बँड पथक मालक व चालक यांनी सर्वांनी जवळच्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील, याबाबत खात्री करूनच प्रवेश द्यावा. पथकातील कलाकार व बँड पथक मालक व चालक यांनी सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील. कोरोना अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी. बँड वाजवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य वेळोवेळी सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने सॅनिटाइज करणे बंधनकारक राहील. बँड पथक चालकाच्या प्रमुखांनी पथकातील कलाकारांची बँड वाजविण्यापूर्वी सॅनिटाइजरची किंवा साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. कोविड 19 साथरोगसंबंधी सर्दी, खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस पथकात प्रवेश देऊ नये. शक्यतो बँड पथकातील कलाकारांनी हँडग्लोजचा वापर करावा, तसेच मास्क, फेसकव्हर लावणे बंधनकारक राहील. बँड पथकातील कलाकार व मालक चालक यांच्या कुटुंबात अथवा निवासस्थान परिसरात कोरोनाचा रूग्ण नसल्याची खात्री करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बँड पथकातील कलाकार व मालक चालक यांचे तापमान व ऑक्सीजन पातळी नोंद घेऊन बँड पथक चालकाच्या प्रमुखांनी नोंदवहीमध्ये नोंद करावी. कोरोनाशी संबंधित वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश, निर्णय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे पालन करण्यास कसूर होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी, या अटी व शर्तीवर पालन करणे बंधनकारक राहील.

 या अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  तसेच भारतीय दंड संहितेच्या १८६०  नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा