कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा आणखी काही दिवस बंदच

0
316

मुंबईः राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा  प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत. जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे आज राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

कंटेन्टमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरू करण्यास राज्य  सरकारने परवानगी दिली असली, तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. तसे करताना ते अधिकची सवलत देऊ शकत नाहीत पण राज्य सरकारने दिलेली सवलत सकारण नाकारू शकतात, असेही आज सरकारने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात दुकानदार व नागरिकांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी राज्य सरकारच्या वतीने  प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.

एक दोन दिवसांत एकल दुकाने सुरू होणारः राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार, शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल, बाजार संकुल व बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटेन्टमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील. क्षेत्रातील स्वतंत्र (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने असे दुकान स्थित असलेल्या गल्ली/रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानांव्यतिरिक्त व्यवहार सुरु असलेल्या इतर दुकानांमध्ये जास्तीत जास्त ५ दुकाने चालू करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, एका लेनमधील कुठली पाच दुकाने सुरू करावीत, यासंदर्भात त्या भागातील दुकानदारांनी आपआपसात ठरविल्यास चांगले होईल. मात्र, तसे न करता आल्यास यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व महानगरपालिका आयुक्त हे निर्णय घेतील, असे गगराणी यांनी सांगितले. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सुधारित आदेश काढल्यानंतर अद्यापही दुकानदारांची तयारी पूर्ण झाली नसल्याने अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली नाहीत. येत्या एक-दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतील.

गरज नसेल तर घराबाहेर पडू नकाः जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू केल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य ती काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

वैद्यकीय कारणांसाठी परवानगीः राज्य सरकारने सध्या कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर भर दिला आहे. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, वैद्यकीय कारणामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात येत असून आतापर्यंत अशा कारणांसाठी ५६ हजार ६०० नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा