देशव्यापी लॉकडाऊनमुळे अजिताबत घाबरू नका, गोंधळून जाऊ नकाः मुखमंत्री ठाकरेंचे आवाहन

0
67

मुंबई:  पंतप्रधानांनी घोषित केलेल्या  देशव्यापी लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले आहे.

ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केली. माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचल्यावर मी स्वत: पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की, आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील, अत्यावश्यक सेवाही सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे, असे आपण पंतप्रधानांना सांगितले. त्यावर युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली यासंदर्भात पंतप्रधानांनी आपल्याला माहिती दिली आणि आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राज्यात मी आधीही सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधी , दुध , भाजीपाला व्यवस्थित पुरवठा होत राहील. या मालाची ने आण करणारी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची खात्री बाळगा, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या माहितीसाठी व्हॉटसएप ग्रुपः कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरित्या मिळावी यासाठी राज्य शासनाने +९१२०२६१२७३९४ या क्रमांकाचा व्हॉटसऍप  चॅटबॉट  ग्रुप सुरु केला आहे याचाही लाभ नागरिक घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही मिळेल.

 परदेशी प्रवाशांनो माहिती लपवू नकाः परदेशातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे, लपवायची नाही. कारण या साथीची लागण होण्यासाठी हेच मोठे कारण आहे. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा