पालघरच्या घटनेचे राजकारण करू नका, ते नंतरही करता येईलः शरद पवारांनी उपटले विरोधकांचे कान

0
368
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पालघरमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून काही लोक आता या घटनेचे राजकारण करत आहेत. राजकारण नंतरही करता येईल, आता कोरोनाच्या संकटाविरुद्ध एकजुटीन लढू या, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालघर येथील झुंडबळीच्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राजकारण करणारांचे आज चांगलेच कान उपटले.

शरद पवार यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यामातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालघरमध्ये जे घडले, ते घडायला नको होते. त्या घटनेचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. पण काही लोक आता या घटनेचे राजकारण करत आहेत. लगेचच राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती गंभीर झाली आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ते चुकीचे आहे. पालघरच्या घटनेचे राजकारण करू नका. राजकारण नंतरही करता येईल. आता कोरोनाच्या संकटाविरुद्ध एकजुटीने लढूया, असे पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोना बळीचा आकडा चिंता वाढवणारा आहे. हे कसे थांबवता येईल, याचा विचार करायला हवा. मीडियान नकारात्मक गोष्टींवर भर देऊ नये. भीती वाढवणाऱ्या बातम्या न देता लोकांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल, हे पहावे. पालघरमधील झुंडबळीचा आणि कोरोनाचा काडीचाही संबंध नाही. जे घडले ते चुकीचेच होते. पण केवळ एका घटनेवरून लगेच संपूर्ण महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली असे म्हणणे आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे योग्य नाही, असे पवार म्हणाले.

आपण काळजी घेतली तर राज्य सरकार कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी शिथिलता देण्याची शक्यता आहे. तसे झाले तर अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करता येईल. शेतीची कामे करता येतील. सरकारने परवानगी दिल्यानुसार कारखाने सुरू करता येतील. उद्योग- व्यवसाय सुरू होतील. हे झाले तरच अर्थव्यवस्था सावरण्याचे मोठे आव्हान आपण पेलू शकू. आपण संकटाच्या बाबतीत नकारात्मक विचार करू नये. आपण त्याचा सामना करणार आहोत आणि यशस्वीही होणार आहोत, असा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा