राज्यात प्रवासासाठी ई-पासची अट रद्द, हॉटेल आणि लॉजेस शंभर टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी

0
241

मुंबई राज्य सरकारने मिशिगन बिगिन अगेनच्या चौथ्या टप्प्यात आंतरराज्य खासगी वाहनासाठी लागू केलेली अट रद्द केली आहे. या टप्प्यात हॉटेल आणि लॉजेसना शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांवरील बंदी या टप्प्यातही कायम ठेवण्यात आली आहे. राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम आहे.

आंतरराज्य प्रवासासाठी राज्य सरकारने खासगी वाहनांसाठी ई-पासची अट लागू केली होती. मात्र, सरकाने सोमवारी ’मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर करताना ई-पासची अट रद्द करून या निर्बंधातून खासगी वाहनांची मुक्तता केली आहे. शाळा, कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असून मेट्रो, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, व्यायामशाळा सुरू करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही.

‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर करताना केंद्र सरकारने मेट्रो सेवा, राजकीय, सार्वजनिक तसेच धार्मिक कार्यक्रम यांना अंशत: परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कोणत्या सवलती देता येतील याचा आढावा घेण्यात आला.

 राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त होत होती. सर्वसामान्य नागरिक तसेच राजकीय पक्षांनीही ही अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील झाली असून राज्यभर मोकळेपणाने प्रवास करता येणार आहे.

ई-पासची अट रद्द करतानाच शाळा, कॉलेज तसेच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो, सिनेमागृह, स्विमिंगपूल, बार, ऑडिटोरियम, सामाजिक-राजकीय, धार्मिक सभांना असलेली बंदीही कायम ठेवली आहे. जिम सुरू करण्याबाबत नव्या आदेशात परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, हॉटेल आणि लॉज यांना पूर्णपणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

सरकारी कार्यालयांत अधिकाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीः राज्य सरकारने शासकीय अ व ब वर्ग अधिकाऱ्यांना शंभर टक्के हजेरी आवश्यक केली आहे. तर त्या खालील कर्मचाऱ्यांना शहरी भागात ३० टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ५० टक्के क्षमतेने हजेरी लावावी लागणार आहे. खासगी कार्यालयांत ३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवता येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा