कोरोनाच्या संकटामुळे भारताच्या विकासदरात ५ टक्क्यांची घसरणः जागतिक बँक

0
34
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे भारताच्या विकासदरात ५ टक्के घट होईल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.

जागतिक बँकेने ‘दक्षिण आशिया आर्थिक अपडेटः कोविड-१९ चा परिणाम’ नावाचा अहवाल रविवारी प्रसिद्ध केला. कोरोनाच्या संटकामुळे भारतातील आर्थिक व्यवहार छिन्नविछिन्न होऊन जातील आणि भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावेल, अशी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक बँकेचे दक्षिण आशियातील मुख्य अर्थशास्त्रज्ञ हॅन्स टिम्मर यांनी हा अहवाल जारी करताना भारताची परिस्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतील, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचे येणे-जाणे आणि मालवाहतुकीवर बंदी आली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याची साखळी छिन्न-विछिन्न होऊन जाईल आणि त्यामुळे आर्थिक विकासदर झपाट्याने कमी होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील गुंतवणुकीत मोठी घट होईल आणि त्याचा विपरित परिणाम आर्थिक सेवाक्षेत्रावर होईल, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. परंतु २०२२ मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होईल आणि त्यानंतर परिस्थिती सुधारू लागेल, अशी अपेक्षाही जागतिक बँकेने व्यक्त केली आहे.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने काय करायला हवे, याचे उत्तरही टिम्मर यांनी दिले आहे. युद्ध पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून प्रत्येकाला जेवण मिळेल, याची भारताने खबरदारी घ्यावी. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या उपलब्धतेच्या संधी निर्माण कराव्या आमि लघु आणि मध्यम उद्योग दिवाळखोरीत निघणार नाहीत, या दृष्टीने पावले उचलावीत, असे टिम्मर यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात जागतिक बँकेने कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी भारताला एक अब्ज डॉलरचे आपत्कालीन अर्थसहाय देण्याची घोषणा केली होती. जास्तीत जास्त लोकांचे स्क्रीनिंग करून कोरोना संशयितांचा शोध घेण्यात यावा, त्यांच्यावर उपचार व्हावेत आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट्सची खरेदी करता यावी, यासाठी हे अर्थसहाय देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा