मोदींच्या घोषणेला आठवडा उलटला तरी ‘कोरोना’ आर्थिक टास्क फोर्सची स्थापना हवेतच!

0
53

नवी दिल्लीः कोरोना विषाणु संसर्गाच्या फैलावामुळे  होणाऱ्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक प्रतिसाद कृती दल म्हणजेच इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या गुरूवारी (१९ मार्च) राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. मात्र या घोषणेला आठवडा उलटून गेला तरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वात स्थापन करायवयाच्या या टास्क फोर्सच्या सदस्यांची नावे मोदी सरकारने अद्यापही जाहीर केलेली नाहीत.

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना असा काही टास्क फोर्स स्थापन करायवयाचा आहे, याचीच कल्पना नव्हती. या टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडूनच केली जाईल, असे त्या म्हणाल्या. नंतर उद्योगधंदे आणि करदात्यांना प्राप्तिकर परतावे दाखल करण्यासाठी सवलती जाहीर करण्यासाठी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक बहुस्तरीय टास्क फोर्स अर्थव्यवस्थेसाठी ठोस सूचना करत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रात रस असलेले उद्योग, शिक्षणतज्ज्ञ आणि खासदारांच्या वेगवेगळ्या उपसमित्या स्थापन करण्यात आल्या असून ते कोणती पावले उचलण्याची आवश्यकता आहे, याबाबतचा तपशील देत आहेत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. त्यांच्याकडून मिळालेल्या तपशीलावर संबंधित विभागाशी चर्चाही करण्यात येत असल्याचे सीतारामण म्हणाल्या. मात्र पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्सची स्थापना नेमकी कधी होईल, याचे ठोस उत्तर त्यांनी दिले नाही. सरकार याबाबतची लवकरच घोषणा करेल, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या  देशव्यापी लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प होणार असून त्याचा सर्वाधिक फटका देशातील गोरगरिबांना बसण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांकडून या वर्गासाठी सर्वसमावेशक व दिलासादायक पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर असताना इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या स्थापनेत मोदी सरकारकडून  होत असलेली चालढकल देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढण्याच्या सरकारच्या तयारीवर काँग्रेसने टिकास्त्र सोडले आहे. ‘ कोरोनाशी लढण्यास जनता तयार आहे. मात्र सरकारच निष्काळजी का आहे? कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनतेने पंतप्रधानांच्या प्रत्येक आवाहनाचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. जर काही उणीव राहिलीच असेल तर ती सरकारच्या स्तरावर राहिली आहे,’ असे काँग्रेसने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा