औरंगाबादः आणखी ८ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १२८ वर

0
654
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद शहरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आज दुपारपर्यंत आणखी ८ जणांच्या घश्यातील स्वॅबचे नमुने कोरोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रूग्णसंख्या १२८ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच ११ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात या ११ जणांची भर पडली असून आज दुपारी ३ वाजेपर्यंतच शहरात एकूण २० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

नव्याने आढळलेल्या ८ रूग्णांमध्ये नूर कॉलनीतील ४ आणि आसेफिया कॉलनीतील ४ रूग्णांचा समावेश आहे. आज बुधवारी सकाळच्या टप्प्यात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णांमध्येही नूर कॉलनीतील ९, भीमनगर, भावसिंगपुऱ्यातील एक आणि एक रूग्ण गुरूदत्तनगर, गारखेडा परिसरातील होता. एकट्या नूर कॉलनीतच आज तब्बल १३ रूग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या प्राप्त रूग्णांची आकडेवारी पाहता नूर कॉलनीत तब्बल २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळण्याच्या बाबतीत नूर कॉलनीने उच्चांक गाठला आहे.

दरम्यान, चिकलठाणा येथील विशेष कोरोना रूग्णालय आणि घाटी रूग्णालयात सध्या ९८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर शहरात आढळलेल्या १२८ रूग्णांपैकी ७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर २३ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी पोहोचले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय म्हणजेच घाटीत कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळा कार्यरत झाल्यामुळे तपासणी अहवाल लवकर मिळत आहेत. यापूर्वी संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान ७२ तास लागत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा